– भारताशी अमेरिकेने व्यापार करार का केला नाही याचे अमेरिकी व्यापारमंत्र्यांनी दिलेले कारण खरे नाही, हे भारताने अन्य कारण स्पष्ट केल्यास आपोआप उघड होईल…
अमेरिकेचे व्यापारमंत्री हॉवर्ड लुटनिक यांच्या विधानास आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने चोख उत्तर दिले ते बरेच झाले. त्यानिमित्त आपण अमेरिकेविरोधात काही प्रमाणात का असेना; पण तोंड उघडले आणि त्यातल्या त्यात तिखट नाही तरी मिळमिळीत म्हणता येणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली. या लुटनिक यांनी अमेरिका-भारत यांच्यात अद्यापही न झालेल्या विशेष व्यापार करारावर भाष्य करताना ‘हा करार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन न केल्यामुळे अडकला’ असे विधान केले. त्यांचे म्हणणे इंग्लंडशी करार झाल्यानंतर अध्यक्ष ट्रम्प यांनी भारताशी अशा कराराबाबत शक्यता सूचित केली होती. म्हणजे सर्व तयारी झाली होती आणि अक्षता तेवढ्या पडायच्या बाकी होत्या, असा त्याचा अर्थ. पण त्या पडल्या नाहीत कारण मोदी यांनी अध्यक्ष ट्रम्प यांचे मानपान केले नाही; त्यांना जातीने फोन केला नाही! या लुटनिक यांच्या मते जवळपास तीन आठवड्यांनंतर भारतास जाग आली आणि मग अध्यक्षांशी करार करण्यासाठी संपर्क साधला गेला. ‘‘स्थानकातून रेल्वेगाडी निघून गेल्यानंतर तुम्ही आलात’’ असे यावर अमेरिकेने भारतीयांस सुनावले असे लुटनिक म्हणाले. या साऱ्यास भारताने रास्त आक्षेप घेतला असून ट्रम्प आणि मोदी यांच्यात गतसाली किती वेळा फोन-संपर्क झाला इत्यादी तपशील प्रसृत केला. लुटनिक यांचे म्हणणे किती खरे, किती खोटे हे कळावयास मार्ग नाही. ते कळणारही नाही आणि तसा प्रयत्न करण्यातही अर्थ नाही. तेव्हा हा मुद्दा सोडून अन्य बाबींवर तथ्याधारित, उपलब्ध माहितीच्या आधारेच भाष्य करणे शहाणपणाचे.
पहिला मुद्दा भारत आणि अमेरिका यांच्यात अद्यापही व्यापार होऊ शकलेला नाही; हा. गतसाली वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्यासह अनेकांनी उभयतांतील हा करार कोणत्याही क्षणी होईल, इतकी त्याची तयारी झालेली आहे असे विधान अनेकदा केले. त्याआधी आणि नंतरही गोयल यांच्यासह अन्य ज्येष्ठ अमेरिकेस गेले आणि अमेरिकी प्रतिनिधी येथे आले. पण हा करार-क्षण प्रत्यक्षात काही उगवला नाही. हे वास्तव. म्हणजे ऐनवेळी कोणती तरी एक माशी शिंकत होती आणि करार लांबत गेला हे अनुमान. ते चुकीचे नाही. कारण वारंवार घोषणा होऊनही हा करार अद्यापही प्रत्यक्षात आलेला नाही हे कोणीही नाकारू शकत नाही, असे सत्य. हा करार भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण त्याच्या अभावी सुरत ते तिरुपूर येथील अनेक उद्याोगांसमोर प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. अमेरिकेने ५० टक्के आयात शुल्क आकारणे सुरू केल्याने भारतीय उत्पादने अमेरिकेत अकारण महाग होऊ लागली असून तेथील ग्राहकांस अनाकर्षक ठरू लागली आहेत. तेव्हा या कराराची गरज हेदेखील नाकारता न येणारे सत्य. आता या सत्य मालिकेतील पुढचा मुद्दा.
हे लुटनिक महाशय म्हणतात तसे झालेले नाही आणि अमेरिका-भारत करार हा मोदी यांनी ट्रम्प यांस फोन न केल्यामुळे लटकलेला नाही हे आपले म्हणणे सत्य असेल- आणि ते असेलच- तर मग हा करार अद्याप का होऊ शकला नाही, हेही आपण सुस्पष्टपणे सांगायला हवे. आता झालाच… आता होणारच… अशा आनंदवार्ता या करारासंदर्भात आपल्या अनेक प्रमुख नेत्यांनी अनेकदा दिल्या. त्या प्रत्यक्षात का आल्या नाहीत? म्हणजे वाङ्निश्चय झाला, सीमांतपूजन इत्यादी होऊनही अंतरपाट दूर होऊन अक्षता का पडत नाहीत, असा याचा अर्थ. लुटनिक महाशय म्हणतात त्याप्रमाणे पंतप्रधानांचा फोन गेला नाही, हे कारण नसेलही. पण मग अन्य कारण कोणते, हे तरी स्पष्ट व्हायला हवे. कारण हे पर्यायी कारण जोपर्यंत समोर येत नाही, तोपर्यंत समोर आलेल्या कारणांवर विश्वास बसण्याचा धोका संभवतो. हे कारण समोर आणण्याचे काम आपल्या दुर्दैवाने अमेरिकेकडून झालेले आहे. याहीआधी गेल्याच आठवड्यात खुद्द ट्रम्प यांनी आपल्या पंतप्रधानांचा नामोल्लेख करून त्यांनी माझ्याशी बोलण्याच्या किती विनवण्या केल्या अशा स्वरूपाचे विधान केले. त्या वेळी दुर्दैवाने आपल्याकडून मौन पाळले गेले. पंतप्रधानांनी अध्यक्षांना काहीही विनवण्या केलेल्या नाहीत आणि त्या केल्या जाणारही नाहीत असे स्पष्टपणे भारताकडून ठणकावून सांगितले गेले असते तर हे लुटनिक महाशय असे काही बोलण्याचे धैर्य दाखवते ना. त्यांची भीड चेपली. कारण ज्यास हाताळायचे आहे त्या घटकाचा बोटचेपेपणा एकदा का दिसून आला की समोरचा घटक आणखी एक पाऊल पुढे टाकणारच. असे होणे नैसर्गिक.
अमेरिकेकडून हेच होत आहे. गेल्या वर्षात आपण इतकी पावले त्या देशासंदर्भात अशा प्रकारे मागे घेतली की आपण आणखी एक पाऊल मागे घेऊ असे त्या देश नेतृत्वास वाटले असेल तर त्यामागील कार्यकारण लक्षात घ्यायला हवे. नवे व्यापारयुद्ध सुरू झाल्यानंतर पंतप्रधानांनी सम्राट ट्रम्प यांच्या दरबारात स्वत:स सादर केले त्यास पुढील महिन्यात १२ फेब्रुवारीस एक वर्ष होईल. या वर्षात बरेच काही घडले आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा धूरही बराच झाला. त्यानंतरच्या भारत-पाकिस्तान संघर्षात आपण शस्त्रसंधी घडवला असे विधान ट्रम्प यांनी किमान ३० वेळा तरी केले. त्याचा तितका जोरदार प्रतिवाद आपण कधी केला? मुळात ट्रम्प यांना चुकीचे, अयोग्य, अवास्तव, अतिरंजित ठरवण्याचे प्रयत्न आपल्याकडून झाले का? असल्यास कधी? ट्रम्प यांनी असत्य (आपल्या मते) गर्जना करायची आणि भारताने सत्य (तेही आपल्या मतेच) तोंडातल्या तोंडात गुणगुणायचे असे किती वेळा झाले? एरवी तडाखेबंद ‘अरे’ला तितक्याच तडाखेबंद ‘कारे’ने प्रत्युत्तर देणाऱ्यांनी ट्रम्प यांस जरा जास्तच डोक्यावर बसू दिले असे झाले आहे किंवा कसे? ट्रम्प यांना सहन केले; आता त्यांचे साजिंदेही आपल्या विरोधात चुरूचुरू बोलू लागले. जे झाले ते अयोग्यच. हाच क्षण आहे ही वेळ आपल्यावर मुळात आलीच का, या प्रश्नास भिडण्याचा.
तसा प्रयत्न प्रामाणिकपणे केल्यास या प्रश्नाचे उत्तर सापडेल. जसे की जे मुळात आपल्या जवळचे नसते, जे संबंध मुदलात सौहार्दाचे नसतात, ते तसे आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न केल्यास ही वेळ येते. अमेरिका आणि भारत आणि त्यातही अमेरिकी अध्यक्ष आणि भारतीय पंतप्रधान यांच्यात दोस्ताना असण्याचे कोणतेही कारण नाही. तरीही या दोघांत जीवश्चकंठश्च मैत्री असल्याचे चित्र निर्माण केले गेले. असा प्रयत्न डेमॉक्रॅटिक पक्षाचे बराक ओबामा असतानाही झाला. त्यांस ‘बराक’ असे पुकारण्यापर्यंत हा देखावा गेला. तो त्यांनी सहन केला कारण त्यांच्या ठायी असलेला सुसंस्कृतपणा आणि व्यावहारिक शहाणपण. ‘‘एखादा आपणास मित्र मानत असेल तर मानू दे… आपले काय जाते? त्यास दुखवा कशाला?’’ असा चतुर आणि सुसंस्कृतपणा ओबामा यांनी दाखवला. त्यामुळे जे आता होत आहे ते त्या वेळी झाले नाही. तथापि आपल्या दुर्दैवाने ट्रम्प तसे नाहीत. राजनैतिक मुत्सद्देगिरीपेक्षा उच्च दर्जाचा रासवटपणा दर्शवण्यात त्यांना काही गैर वाटत नाही. त्यात आत्मप्रेमी. अशा व्यक्ती सत्ताकेंद्री आल्या की व्यवस्थेपेक्षा मोठ्या होऊ पाहतात.
आता आपल्यावर ही वेळ आली त्यामागील कारण हे. ते लक्षात घेतले नाही तर ती पुन्हा येणार. हा काळच शहाण्या राजनैतिकांपेक्षा रासवटांचा. त्यात अधिक तगडा रासवट बाजी मारणार.




