spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नवेगाव–नागझिरा पर्यटन स्थळी वाढते प्रदूषण; व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह

यासीन शेख, गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या नवेगाव–नागझिरा बांध परिसरात वाढत चाललेले प्रदूषण, अस्वच्छता आणि व्यवस्थापनातील गोंधळ यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. नैसर्गिक सौंदर्य, विशाल तलाव आणि स्थलांतरित पक्ष्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या नवेगाव–नागझिरा वन्यजीव अभयारण्य परिसरात दरवर्षी देश-विदेशातून हजारो पर्यटक भेट देतात. मात्र अलीकडच्या काळात परिसरात वाढलेल्या प्लास्टिक कचऱ्यामुळे आणि दुर्लक्षित स्वच्छतेमुळे या पर्यटन स्थळाच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे.

परिसरात फेरफटका मारताना अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्या, पॅकेट्स आणि इतर कचरा विखुरलेला दिसून येतो. काही स्टॉलधारकांकडून साफसफाई केली जात असली तरी कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्याचे सांगितले जाते. काही ठिकाणी कचरा जाळला जातो किंवा परिसरातच टाकून दिला जातो. त्यामुळे पर्यावरणीय प्रदूषण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या संदर्भात विचारणा केली असता डेप्युटी डायरेक्टर प्रीतम कोडापे यांनी “या बाबत चौकशी करतो,” अशी प्रतिक्रिया दिली. तर स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या पर्यटन स्थळाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आरएफओ प्रमोद पझारे यांच्याकडे आहे. मात्र पझारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की त्यांच्या जबाबदारीत फक्त लॉजिंग आणि बोर्डिंग व्यवस्थापन येते. लॉजिंग-बोर्डिंगच्या कंपाउंडच्या बाहेरील परिसर हा सरकारी जागा असल्यामुळे त्या भागाची साफसफाई संबंधित ग्रामपंचायतीने करणे अपेक्षित आहे.

पझारे यांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायतीला अनेक वेळा पत्र देऊनही साफसफाईबाबत अपेक्षित कारवाई होत नाही. परिस्थिती बिघडू नये म्हणून कधी कधी त्यांच्या कर्मचाऱ्यांकडूनच साफसफाई केली जाते. तसेच येथे मनुष्यबळ आणि निधीची कमतरता असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारने याकडे विशेष लक्ष दिल्यास व्यवस्थापन सुधारू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मात्र या स्पष्टीकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे. गार्डन, तलाव परिसर आणि सार्वजनिक पर्यटन सुविधा यांची देखभाल नेमकी कोण करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. काही ठिकाणी विद्युत कनेक्शनही बंद पडल्याची माहिती मिळत असून संध्याकाळनंतर परिसरात अंधाराचे वातावरण निर्माण होत असल्याचे सांगितले जाते.

याशिवाय येथे असलेल्या लॉजिंग आणि बोर्डिंग सुविधांची स्थितीही समाधानकारक नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. पर्यटकांसाठी असलेल्या कॉटेजमध्ये अनेकदा स्वच्छ बेडशीट उपलब्ध नसतात. उन्हाळ्यात वापरासाठी लावलेले कुलर अनेक ठिकाणी जीर्ण अवस्थेत असून त्यात पाणी नसल्यामुळे ते व्यवस्थित काम करत नाहीत.

कॉटेज परिसरातील स्वच्छतेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक ठिकाणी डस्टबिन अस्ताव्यस्त पडलेले दिसतात. झाडांवरून पडलेला पालापाचोळा रस्त्यावर आणि परिसरात पसरलेला असल्यामुळे अस्वच्छतेचे चित्र दिसते. बाथरूमची स्थितीही समाधानकारक नसून तेथे साबण किंवा इतर स्वच्छता सुविधा उपलब्ध नसल्याच्या तक्रारी पर्यटकांकडून केल्या जात आहेत.

दरम्यान साफसफाईसाठी सुमारे चारशे रुपये रोजीने मजूर ठेवले जातात, अशी माहिती मिळते. मात्र स्थानिकांच्या मते हे मजूर प्रत्यक्षात अपेक्षित काम करत नसून केवळ उपस्थिती दाखवतात. त्यामुळे मजूर असूनही स्वच्छतेची अवस्था सुधारत नसल्याचे बोलले जात आहे.

याशिवाय कॉटेजचे ऑनलाईन आरक्षण करण्याची अधिकृत व्यवस्था असतानाही काही वेळा अधिक पैसे घेऊन तत्काळ रूम उपलब्ध करून दिल्या जात असल्याची चर्चा स्थानिकांकडून केली जात आहे. या आरोपांची चौकशी करण्याची मागणीही होत आहे.

या प्रकरणाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी काही पत्रकारांनी कार्यालयाला भेट दिली असता त्या वेळी कार्यालयात फक्त एक कर्मचारी उपस्थित होता. उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले की संबंधित अधिकारी साकोली येथील मुख्यालयात क्रीडा स्पर्धांमुळे गेले आहेत. त्यामुळे कार्यालयातील नियमित कामकाज कोण पाहत आहे याबाबत स्पष्टता नव्हती.

दरम्यान या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी आमदार राजकुमार बडोले आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून तक्रार नोंदवली आहे. तसेच नवेगाव फाउंडेशनचे रामदास बोरकर यांनीही संबंधित विभागाकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचे सांगितले जाते. मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

नवेगावचा तलाव हा स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्त्वाचे अधिवास क्षेत्र म्हणून ओळखला जातो. हिवाळ्यात जगभरातील अनेक पक्षी येथे येतात. मात्र स्वच्छता आणि व्यवस्थापनाकडे वेळेत लक्ष दिले गेले नाही तर या पर्यटन स्थळाची ओळख आणि महत्त्व कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.