spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भंडारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निकृष्ट जेवणाचा प्रकार उघड; खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचा कडक इशारा

– कंत्राटदाराची बिले रोखून कंत्राट रद्द करण्याचे आदेश; ८ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांना पुरविल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जाबाबत अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी आज रुग्णालयाला अचानक भेट देऊन भोजन कक्षाची पाहणी केली असता, तेथील भयावह वास्तव समोर आले. याप्रकरणी खासदारांनी संताप व्यक्त करत दोषी कंत्राटदारावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

खासदार डॉ. पडोळे यांनी केलेल्या या आकस्मिक पाहणीत भोजन कक्षात सर्वत्र घाण आणि दुर्गंधी पसरल्याचे दिसून आले. रुग्णांना दिले जाणारे अन्न अत्यंत निकृष्ट, अस्वच्छ आणि काही ठिकाणी चक्क कच्चे असल्याचे आढळले. विशेष म्हणजे, स्वयंपाकगृहात नियमांचे उल्लंघन करून व्यावसायिक गॅस सिलिंडरऐवजी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत असल्याचेही समोर आले. ही बाब केवळ बेकायदेशीर नसून रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे.

रुग्णांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही!

या गंभीर प्रकारावर बोलताना खासदार डॉ. प्रशांत पडोळे म्हणाले की, “रुग्णांच्या आरोग्याशी असा थेट खेळ होणे अत्यंत चिंताजनक आहे. शासनाच्या नियमांचे आणि अटींचे उल्लंघन करून निकृष्ट दर्जाचे अन्न पुरविणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही.” त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली.

या संदर्भात खासदारांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना सविस्तर पत्र देऊन सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत संबंधित कंत्राटदाराची सर्व देयके (बिले) तात्काळ थांबविण्यात यावीत आणि प्राथमिक स्वरूपात त्याचे कंत्राट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे. तसेच, या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल पुढील ८ दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या या धडक कारवाईमुळे रुग्णालय प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. रुग्णालयातील भोजन व्यवस्थेतील हलगर्जीपणा समोर आल्याने आता प्रशासन संबंधितांवर काय ठोस पावले उचलते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, खासदारांच्या या तत्पर भूमिकेबद्दल रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून समाधान व्यक्त होत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.