खापा, वार्ताहर :- समाजाची निस्वार्थी भावनेने व निष्ठेने सेवा करणाऱ्या व शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार शासनाकडून देण्यात येतात. असाच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२१- २२ मध्ये प्रहार शिक्षक संघटनेचे नागपूर विभाग सचिव गजानन कुरवाडे, संघटनेचे विभाग पदाधिकारी राजकुमार तिरभाने यांना शासनाच्या वतीने प्रदान करण्यात आला. परंतु शिक्षण श्रेत्रातील भययुक्त वातावरण लक्षात घेता हा पुरस्कार शासनास परत करण्याचा इशारा नागपूर विभाग प्रमुख अजय भोयर यांनी प्रसिद्धी पत्रकातुन दिला. हा निर्णय नागपूर विभागाच्या संघटनेच्या सभेत घेण्यात आला.
सध्या शिक्षकांच्या नोकऱ्या सुरक्षित व भयमुक्त नाही व विद्यार्थ्यांचे भवितव्यही सुरक्षित नाही. शिक्षण क्षेत्रात जे काही सुरू आहे ते अतिशय भयावह आहे. राज्यभरात शिक्षकांमध्ये असुरक्षिततेची भावना व वैफल्यग्रस्त वातावरण निर्माण झालेले आहे. म्हणून एक त्रागा किंवा चीड म्हणून हा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार परत करण्याचा इशारा शासनास देण्याचा निर्णय प्रहार शिक्षण संघटनेने घेतलेला आहे.
१५ मार्च २०२४ च्या संच मान्यतेच्या शासन निर्णयानुसार राज्यातील अनुदानित शाळा पूर्णतः कोलमडून गेलेल्या आहे. राज्यात शेकडो शाळा ह्या शासन निर्णयानुसार बंद पडणार असून हजारो विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर पडणार आहे. हा शासन निर्णय बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमाचा भंग करणारा आहे.
सरसकट टी ई टी बंधनकारक करणे शिक्षकांच्या आयुष्याशी खेळ करणारा निर्णय असुन कार्यरत सर्व शिक्षकांना संरक्षण दिले पाहिजे व कोणत्याही शिक्षकाच्या नोकरीवर गदा येणार नाही अशी कृती शासनाने करावी. कारण शिक्षकांमध्ये भययुक्त वातावरण निर्माण झालेले आहे. भयमुक्त वातावरण निर्माण झाल्याशिवाय ज्ञानदानाचे काम प्रभावीपणे होऊ शकत नाही.
भारतभर जुन्या पेन्शनबाबत आक्रोश असताना देखील शासन पेन्शनच्या मुद्द्यावर ब्र ही काढायला तयार नाही. राज्यात १ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्त २६ हजार शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी बरेच सेवानिवृत्त झाले तर बरेच मृत्यू पावलेले आहेत.
शिक्षकांना सातत्याने अशैक्षणिक कामात जुंपवुन ठेवणे सुरु आहे. त्यामुळे शिक्षकांना शाळेत कमी अशैक्षणिक कामात जास्त गुंतवून ठेवण्याचे काम सुरू आहे राज्यभर अनेक वर्षापासून वर्षभर शिक्षक बी. एल. ओ. सारख्या अशैक्षणिक कामामुळे शिक्षक शाळा सोडुन वन वन फिरतो. अशैक्षणिक कामे पूर्णतः काढून घेतली पाहिजे व शिक्षकांना शिकवु द्या व विद्यार्थ्यांना शिकू द्या, अशी कृती शासन स्तरावर झाली पाहिजे.
भ्रष्ट अधिकारी व काही भ्रष्ट संस्थाचालक सातत्याने शिक्षकांचे शोषण करीत आहेत. शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी सातत्याने वाढत चाललेला आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यावर कोणताही अंकुश नाही, शिक्षकांची लूटमार सुरु आहे.
राज्यात गेल्या पंचवीस-तीस वर्षापासून जवळपास ६० हजार शिक्षक अल्पशा वेतनावर अंशतः अनुदानित तत्त्वावर काम करीत आहेत. त्यापैकी कित्येक शिक्षकांचा वैफल्यग्रस्त होऊन जीव गमावलेला आहे.
वरील सर्व विषयांसह प्रचंड समस्या शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेल्या आहेत. शिक्षक हतबल झालेला आहे. आंदोलने करुनही दखल घेतल्या जात नाही. शेवटी वैतागुण प्रहार शिक्षक संघटनेनेच्या वतीने हा निर्वाणीचा इशारा देण्यात आलेला आहे. शासनाने तात्काळ उपरोक्त मुद्द्यावर सकारात्मक विचार न केल्यास राज्यभर प्रचार प्रसार करून आजपर्यंत ज्यांना ज्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत, त्या सर्वांना एकत्र करून माननीय बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वात लवकरच सर्व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक त्यांचे पुरस्कार शिक्षण मंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकातून कळविण्यात आलेले आहे.
यावेळेस प्रहार शिक्षक संघटनेचे नागपूर विभाग प्रमुख अजय भोयर, नागपूर विभाग सचिव गजानन कुरवाडे, विभाग पदाधिकारी राजकुमार तिरभाने, धनराज कावटे, योगराज ढेंगे, पृथ्वीराज चव्हाण, विजय काळे, बाळनाथ मानकर, नितिन निरगुडे, राजीव धात्रक, पुंडलिक नागतोडे, मुकेश इंगोले सह मोठ्याप्रमाणात शिक्षक उपस्थित होते.








