नागपूर :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज आता सन 2026-27 पासून ‘महाशिष्यवृत्ती’ या एकात्मिक संगणकीय प्रणालीद्वारे mahadbt2.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर स्वीकारले जात आहेत. समाज कल्याण विभाग, नागपूरचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुळकर्णी यांनी पात्र विद्यार्थ्यांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज सादर करून या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
या प्रणालीअंतर्गत सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, इयत्ता 9 वी व 10 वी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती तसेच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे मॅट्रिक पूर्व शिक्षण व परीक्षा फी प्रदाने यांसारख्या विविध योजना राबविल्या जात आहेत.
शिष्यवृत्तीचा लाभ सुलभतेने मिळण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे. इयत्ता 9 वी व 10 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांकडे अद्ययावत जात प्रमाणपत्र आणि पालकांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा होणार असल्याने बँक खाते चालू स्थितीत असावे तसेच खात्याची KYC पूर्ण असावी. यासोबतच बँक खाते आधार क्रमांकाशी लवकरात लवकर लिंक (Ceed) केलेले असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख व इतर सर्व तपशील सर्व कागदपत्रांमध्ये अचूक व समान असल्याची खात्री पालकांनी करावी.
शिष्यवृत्तीच्या लाभापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी शाळेमार्फत मागितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे विहित मुदतीत जमा करावीत. अर्जाची सविस्तर पद्धत व पात्रतेचे निकष संकेतस्थळावरील युजर मॅन्युअलमध्ये उपलब्ध असून, अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.





