– राज्य निवडणूक आयोगाचे प्रसारमाध्यमांना निर्देश
नागपूर :- राज्य निवडणूक आयोगाने नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांसाठी महत्त्वाची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. निवडणुका निष्पक्ष आणि शांततेत पार पडण्यासाठी वृत्तपत्रे आणि न्यूज चॅनल्सनी ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
नागपूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या १५ जानेवारी रोजी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश, २०२५ नुसार निवडणुकासंदर्भात प्रसारमाध्यमांसाठी प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. यानुसार प्रसार माध्यमांनी उमेदवारांबद्दल बातम्या देताना वस्तुनिष्ठ असाव्यात, कोणत्याही पक्षाचा प्रचार करताना अतिशयोक्ती करू नये,. प्रसारमाध्यमांनी धर्म, जात, पंथ किंवा भाषेवरून लोकांमध्ये वाद निर्माण होईल, असे कोणतेही लिखाण किंवा वृत्त प्रसिद्ध करू नये.
उमेदवाराच्या वैयक्तिक आयुष्यावर खोटी टीका करू नका. उमेदवारी किंवा अर्ज मागे घेण्याबाबतच्या चुकीच्या बातम्या प्रसिद्ध करू नका. शहानिशा केल्याशिवाय कोणतेही आरोप प्रसिद्ध करू नका. पुराव्याशिवाय आणि खोट्या माहितीच्या आधारे कोणाचीही बदनामी करू नका असेही ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहे. प्रसारमाध्यमांनी एखादा उमेदवार किंवा राजकीय पक्षाची भूमिका मांडण्यासाठी आर्थिक किंवा इतर प्रकारे कोणत्याही प्रलोभन स्वीकारू नये. कोणताही उमेदवार किंवा पक्ष यांच्याकडून अथवा त्यांच्यावतीने देऊ केलेले कोणतेही आतिथ्य किंवा इतर सुविधा यांचा स्वीकार करु नये.
प्रसारमाध्यमांनी कोणताही विशिष्ट उमेदवार किंवा पक्ष यांच्या प्रसारास वाव देऊ नये, तर तसे झाल्यास इतर उमेदवार किंवा पक्ष यांना त्यावर त्यांचे मत मांडण्याची संधी द्यावी. प्रसार माध्यमांनी एखाद्या सत्ताधारी पक्ष किंवा शासन यांच्या कामगिरी संबंधातील सरकारी राज्य कोषातील खर्चाने दिलेली कोणतीही जाहिरात स्वीकारू नये तसेच प्रसिद्ध करू नये.
राज्य निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी किंवा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी वेळोवेळी जारी केलेल्या निर्देशांचे, आदेशांचे आणि अनुदेशांचे पालन प्रसारमाध्यमांनी करावे, असेही स्पष्ट केले आहे.




