Home Latest News पंतप्रधान मोदी जनतेला दिलासा देतात मात्र राऊत भोंगा वाजवून देशविरोधकांना दिलासा देतात

पंतप्रधान मोदी जनतेला दिलासा देतात मात्र राऊत भोंगा वाजवून देशविरोधकांना दिलासा देतात

0
88

– संजय राऊत यांना ‘पाकिस्तान रत्न’ पुरस्कार द्या 

– भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा टोला

मुंबई :- संजय राऊत हे पाकिस्तानचे कायमस्वरुपी प्रवक्ते आहेत. टीम इंडियाच्या विजयावर अभिनंदनाचे एकही ट्वीट नाही, पण पाकिस्तानसाठी नितांत प्रेम मात्र वारंवार व्यक्त करतात, पाकचीच भाषा बोलतात म्हणूनच राऊतांना ‘पाकिस्तान रत्न’ पुरस्कार देऊन थेट पाकिस्तानातच पाठवावे, अशी जोरदार टीका भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बन बोलत होते. पंतप्रधानांनी रविवारी जीएसटीमधून दोन लाख कोटींचा दिलासा दिला, लोकोपयोगी घोषणा केल्या. त्यामुळेच काल पंतप्रधानांनी जनतेला उद्देशून संबोधन केल्यावर राऊत आणि विरोधकांना हादरा बसला असा टोमणा बन यांनी मारला. राऊत यांचा भोंगा देशाच्या भल्यासाठी नसतो, तो राहुल गांधी आणि सोनिया गांधींसाठी असतो असेही ते म्हणाले.

यावेळी बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला संबोधित करत जनतेच्या भल्यासाठी घोषणा करून जनतेला दिलासा देतात. मात्र खा. संजय राऊत हे रोज सकाळी भोंगा वाजवत देशविरोधकांना दिलासा देतात राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान जेव्हा बोलतात, तेव्हा देशद्रोही, पाकिस्तानप्रेमी आणि भारतविरोधी कारवाया करणाऱ्यांची पायाखालची वाळू सरकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजवर 140 कोटी जनतेला ऐतिहासिक भेटी दिल्या आहेत. 370 कलम हटवून देश एकसंघ केला. राममंदिराचे शतकानुशतकांचे स्वप्न पूर्ण केले, जीएसटीतून दोन लाख कोटींची सवलत जाहीर करून सामान्य माणसाला थेट दिलासा दिला. पण संजय राऊत यांच्या डोळ्यांवर पत्राचाळीच्या काळ्या पैशांनी झापड आल्यामुळे त्यांना हे काहीच दिसत नाही. पत्राचाळ घोटाळ्यात मराठी माणसांची फसवणूक करणा-या राऊत यांना मोदींवर बोलण्याचा अधिकार नाही. आधी पत्राचाळीत मराठी माणसाला फसवून लुटलेले 50-50 लाख रुपये परत द्या आणि मग पंतप्रधानांवर टीका करा असे आव्हान बन यांनी दिले.

भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानला दोनदा पराभूत करून क्रिकेटरूपी मिसाईल टाकले. सूर्यकुमारसारख्या खेळाडूंनी पाकिस्तानचा अहंकार चिरडला. पण संजय राऊत यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले का? पाकिस्तानाविरुद्ध दोन विजयांनंतर एक तरी अभिनंदनाचे ट्विट राऊत यांनी केले का? असे खोचक प्रश्न विचारत राऊत हे नेहमी पाकचे गोडवे गातात असा निशाणा साधला. पाकिस्तानी खेळाडू फरहानने अर्धशतक केल्यावर बॅट बंदुकीसारखी धरून केलेले सेलिब्रेशन हे निंदनीय आहे. पण त्यावरून मोदी सरकारला दोष देणे हे हास्यास्पद आहे अशी टीका बन यांनी केली. खेळाचे मैदान असो वा युद्धाचे मैदान, भारताने पाकिस्तानला नेहमी पराभूत केले आहे. मोदी सरकारने कायम देशाचे रक्षण केले, भारतीय क्रिकेट संघाने आशिया कप स्पर्धेतही मैदानावर लढून विजय मिळवून भारताची मान उंचावली असेही यांनी नमूद केले. संजय राऊत हे स्वतः जुगारी आहेत. काल भारत-पाक सामन्यात राऊत यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या बाजूने सट्टा लावला आणि म्हणूनच पाकिस्तान हरल्यानंतर लाखो रुपये बुडाल्याने राऊतांची चिडचिड होत असून, राऊत हे मोदी सरकार आणि बीसीसीआयवर आरोप करत आहेत असा टोलाही त्यांनी लगावला. पाकिस्तानवर सट्टा लावून भारतीय संघावर आरोप करणे म्हणजे राष्ट्रद्रोह आहे अशी बोचरी टीका बन यांनी केली.

‘मोदी पॅटर्न’ घरात घुसून शत्रूंचा विनाश करतो

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली बलशाली भारताचा ‘मोदी पॅटर्न’ म्हणजे घरात घुसून शत्रूचा विनाश करणे. आणि हा पॅटर्न भारताच्या 140 कोटी जनतेला माहिती आहे. आजचा नवभारत हा घाबरत नाही, तर पाकिस्तानला थेट उत्तर देतो. दुसरीकडे मात्र संजय राऊतांचा पॅटर्न म्हणजे पाकिस्तानचे झेंडे फडकवणे आणि पाकिस्तानचा उदाउदो करणे हा आहे. राऊत हे पाकिस्तानच्या पॅटर्नला पुढे नेत असून भारताचा नवा पॅटर्न मोदींच्या नेतृत्वाखाली देशाला बलशाली करून, सर्वांची सुरक्षा करत आहे असे बन यांनी अधोरेखित केले. राऊतांनी ठाण्याचे ‘बीड होईल’ हे वक्तव्य करून बीडची बदनामी केली.त्याचा समाचार घेत बन म्हणाले की, बीड हा संत महात्म्यांचा, साहित्यिकांचा जिल्हा आहे. मुकुंदराज, माऊली महाराज, स्व. गोपीनाथ मुंडे यांची बीड ही भूमी आहे. काही मोजक्या घटनांवरून संपूर्ण जिल्ह्याची बदनामी करण्याचा प्रयत्न भाजपा सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिला. नाशिकची वाट लावून झाल्यावर राऊतांची ठाण्याकडे नजर आहे असे म्हणत बन यांनी राऊतांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, संजय राऊत हे नाशिकचे संपर्कप्रमुख होते आणि त्यांनी तिथली शिवसेना उद्ध्वस्त केली. आता त्यांनी मोर्चा ठाण्याकडे वळवला आहे. ठाणेकरांनी सावध राहावे, नाहीतर नाशिकसारखीच वाट ठाण्याचीही लागेल.

आमचा झेंडा हिंदुत्वाचा, त्याला दांडा राष्ट्रभक्तीचा. राऊतांचा झेंडा पाकिस्तानचा, दांडा राहुल गांधींचा

संजय राऊत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सतत टीका करतात त्यावरून राऊतांवर टीकास्त्र सोडत  बन म्हणाले की संघाचा भगवा झेंडा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे. हा झेंडा हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहे. उलट राऊतांचा झेंडा हा पाकिस्तानचा आहे आणि त्याला दांडा राहुल गांधींचा आहे. संघाचा दसरा मेळावा ही शंभर वर्षांची परंपरा आहे. हिंदुत्वाचा भगवा झेंडा उंचावण्याचे काम संघ सातत्याने करतोय मात्र राऊतांचे पाकिस्तानी प्रेम उतू जातेय अशी टीका त्यांनी केली.

काँग्रेसला विचार नव्हे तर देश जाळायचा आहे!

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘नवनाथ बन यांचे विचार जाळू’ या केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत बन म्हणाले की वास्तवात काँग्रेसला विचार जाळायचे नाहीत, त्यांना देश जाळायचा आहे. राहुल गांधी ट्वीट करून नेपाळसारखी अराजकता निर्माण करण्याचे संकेत देतात. आणि त्यांचे प्रादेशिक नेते महाराष्ट्रात जाळपोळीची भाषा करतात. पण 140 कोटी जनतेचे आशीर्वाद मोदींना आहेत. महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद देवेंद्र फडणवीस आणि महायुतीला आहेत. आमचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे, हिंदुत्वाचे आहेत. ते कधीही जळू शकत नाहीत. काँग्रेसने कितीही जाळपोळ केली, तरी हिंदुत्वाचा दीप विझणार नाही.