नागपूर :- नागपूर शहर व नागपूर ग्रामीण भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना शासनाने तातडीने सर्वेक्षण करून प्रत्येक कुटुंबाला ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आक्रमण युवक संघटनेच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात तहसीलदार खंडारे यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अतिवृष्टीमुळे सावनेर, कुही, उमरेड, कामठी, कन्हान तसेच नागपूर शहरातील बिनाकी ले आऊट, जरीपटका, वैशाली नगर, वर्धमान नगर, नरेंद्र नगर, त्रिमूर्ती चौक, इमामवाडा आदी परिसरांमध्ये पावसाचे पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घरगुती साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू, विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके व इतर जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आक्रमण संघटनेने केली आहे. तसेच ही मदत लवकरात लवकर जाहीर न झाल्यास तहसीलदार कार्यालयाला घेराव घालून कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशाराही आक्रमण युवक संघटनेने दिला. यावेळी जिल्हा संयोजक ओपूल तामगाडगे, जिल्हाध्यक्ष विशाल बनसोड, जिल्हा महासचिव सूरज पुराणिक, शहर सचिव अजय गायकवाड, विक्की वानखेडे, अविष्कार कांबळे, पंकज नाखले, जुगनू डांगरे, राजू मेश्राम तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अतिवृष्टीग्रस्तांना प्रत्येकी ५० हजारांची मदत द्या; अन्यथा तहसील कार्यालयाला टाळे ठोकू – आक्रमण युवक संघटना









