– काँग्रेस सेवादल आक्रमक: मेडिकल सुपरिटेंडंटना दिले निवेदन
कामठी :- येथील उपजिल्हा रुग्णालयात सध्या केवळ महिलांचीच सोनोग्राफी केली जात असून, पुरुषांसाठी ही सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. ही महत्त्वाची सुविधा पुरुषांसाठीही त्वरित सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस सेवादलाच्या वतीने देण्यात आला आहे.
या संदर्भात सेवादलाचे ब्लॉक अध्यक्ष डॉ. सुनील वाघमारे यांच्या नेतृत्वात उपजिल्हा रुग्णालयाच्या मेडिकल सुपरिटेंडंटना निवेदन सादर करण्यात आले.
वरिष्ठ नागरिकांची परवड: ६० वर्षांवरील अनेक ज्येष्ठ नागरिकांना सोनोग्राफीसाठी खासगी केंद्रांवर किंवा नागपूरला जावे लागते, जे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही.
कॅन्टोन्मेंट रुग्णालयासारख्या छोट्या रुग्णालयात महिला आणि पुरुष दोघांचीही सोनोग्राफी होते, मग एवढ्या मोठ्या उपजिल्हा रुग्णालयात ही सुविधा का नाही? असा सवाल निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे.
केवळ सोनोग्राफीच नव्हे, तर इतर सर्व आजारांच्या आवश्यक चाचण्या देखील पुरुषांसाठी याच रुग्णालयात उपलब्ध करून द्याव्यात.
“रुग्णालय मोठे असूनही पुरुषांना सेवेपासून वंचित ठेवणे चुकीचे आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर आम्हाला ‘उपोषण’ करून लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल.”
– डॉ. सुनील ज. वाघमारे (अध्यक्ष, कामठी शहर काँग्रेस सेवादल)
यावेळी सहसचिव राजकुमार गेडाम यांच्यासह काँग्रेस सेवादलाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.








