Home Latest News खोटे आरोप करून राहुल गांधी यांनी मतदारांचा अपमान केला, राजुऱ्याचे आ. देवराव...

खोटे आरोप करून राहुल गांधी यांनी मतदारांचा अपमान केला, राजुऱ्याचे आ. देवराव भोंगळे यांचा घणाघात

0
147

– राहुल गांधींनी मतदारांची माफी मागावी – भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी

मुंबई :- राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत राजुरा मतदारसंघात बोगस मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आल्याचा केलेला आरोप तद्दन खोटा आरोप आहे. खोटे कथन करून मतदारांचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे राजुरा मतदारसंघाचे आ. देवराव भोंगळे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. राजुरा मतदार संघातील मतदार यादीतील नावांबाबत भाजपा शहराध्यक्षांनी केलेल्या तक्रारीनंतर आयोगाने नावे रिजेक्ट केली ती नावे डीलीट केली नसल्याचे वास्तव आ. देवराव भोंगळे यांनी यावेळी पत्रकारांसमोर ठेवले.

यावेळी उपाध्ये म्हणाले की, राजुरा मतदारांची नावे वाढली नाही तर नावे रिजेक्ट करण्यात आली आहेत. सातत्याने राहुल गांधी पुराव्याविना खोटे पसरवत आहेत. त्यांचा कालचा हायड्रोजन बॉम्ब म्हणत फोडण्याचा केलेला प्रयत्न हा फसला कारण तो भीजलेला सुतळी बॉम्ब होता. राहुल गांधी हे खोटे बोलण्याचे महागुरू आहेत अशी बोचरी टीकाही उपाध्ये यांनी केली. राहुल गांधी आणि काँग्रेसचा मतदार नावे फेरफाराच्या फेक नरेटिव्हचा फज्जा उडाल्याचेही  उपाध्ये म्हणाले.

उपाध्ये म्हणाले की, राजुरा मतदारसंघातील मतचोरी बाबत ढळढळीत खोटी माहिती राहुल गांधी सर्वांसमोर ठेवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळात ज्याला चोरी करायची असते तो आधीच तक्रार का दाखल करेल. भाजपाचे शहर अध्यक्ष अरविंद डोहे यांनी 21 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजे मतदानापूर्वी 29 दिवस आधीच निवडणूक कार्यालय, तहसिलदार आणि पोलिसांना मतदारयादीत बोगस मतदार समाविष्ट करणाऱ्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारी तक्रार केली होती, असे नमूद करीत उपाध्ये यांनी त्या तक्रारीची प्रत सादर केली. आता काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर डाव उलटणार आणि पितळ उघडे पडणार असे कळल्यावर राहुल गांधी हायड्रोजन बॉम्ब म्हणत फुसका बार फोडत आहेत असेही उपाध्ये म्हणाले.

राजुरा विधानसभेच्या निकालाचा इतिहास पाहता तिथे निवडून येणारा उमेदवार हा दोन ते अडीच हजार मतांच्या आघाडीने निवडून येतो यात काही नवीन असे नाही. उपाध्ये यांनी आकडेवारी मांडत म्हटले की, 2024 ला 3000 मतांनी, 2019 ला 2501 मतांनी तर 2014 ला 2278 मतांनी उमेदवार निवडून आला आहे. भाजपाची 70 हजार मते राजुरा मध्ये कायम आहेत, मात्र काँग्रेसचीच 9 हजार मते तिथे वाढली आहेत 60 वरून 69 हजार मते काँग्रेसला मिळाली आहेत. तेव्हा मते वाढली कोणाची आणि कशी याबाबत संशय आहे. काँग्रेसने आ. भोंगळे या ओबीसी आमदाराच्या विजयावर प्रश्नचिन्ह उभे करून पुन्हा एकदा काँग्रेसचा ओबीसी विरोधी चेहरा उघड केला आहे असा हल्लाबोलही त्यांनी केला. मतदारांचा राहुल यांनी अपमान केलाय तेव्हा जनता काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय रहाणार नाही असेही ते म्हणाले.

यावेळी आ. देवराव भोंगळे यांनी राहुल यांचे आरोप फेटाळत राहुल गांधी हे खोटे बोल, रेटून बोल या नीती नुसार तद्दन खोटे पसरवत आहेत अशी टीका केली. भाजपाकडूनच मतदानापूर्वी तक्रार दाखल करण्यात आली होती त्याचा तपास केल्यावर निवडणूक आयोगाने काही नावे रिजेक्ट केली ती नावे डीलीट केली नाहीत हा खुलासा आ. भोंगळे यांनी केला. मतचोरी झालीच नाही आणि मतचोरीचा डांगोरा राहुल गांधी पिटत आहेत. निवडणूक आयोग, मतदार यांचा अपमान राहुल गांधी करत आहेत. राजुरा मतदारसंघाला बदनाम करत आहेत त्याचा आम्ही निषेध करतो असे सांगत, त्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोर शिक्षा व्हावी असेही मत भोंगळे व्यक्त केले.