– वडोदा पोलिसांची कारवाई; चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
कामठी :- कामठी तालुक्यातील सोनेगाव राजा शिवारात कन्हान नदीपात्रातून अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या आरोपींवर वडोदा पोलिसांनी कारवाई करत दोन ट्रॅक्टर-ट्रॉलींसह तब्बल १२ लाख ५५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस स्टेशन वडोदा येथील पथक १४ मार्च २०२६ रोजी नियमित पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारांकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, सोनेगाव राजा परिसरातील रेती घाटातून ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे अवैध रेती वाहतूक सुरू आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कन्हान नदीच्या पात्रात छापा टाकला.
या कारवाईदरम्यान पोलिसांना दोन ट्रॅक्टर-ट्रॉली रेतीसह आढळून आल्या. त्यामध्ये एमएच-४०/बीई-५५४४ क्रमांकाचा आयसर कंपनीचा ट्रॅक्टर व एमएच-४०/डीई-३३२२ क्रमांकाची ट्रॉली तसेच एमएच-४०/बीजे-८३३२ क्रमांकाचा सोनालीका ट्रॅक्टर व विनानंबरची ट्रॉली यांचा समावेश आहे. वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये रेती आढळून आली. चालकांकडे रेती वाहतुकीसाठी कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.
पहिल्या ट्रॅक्टरचा चालक मंगेश सिंधुजी घुरघुसे (३५, रा. सोनेगाव राजा) असून वाहन मालक राहुल त्रिंबक महल्ले असल्याचे सांगितले. तर दुसऱ्या ट्रॅक्टरचा चालक विकास कृष्णाजी चिखलकार (३७, रा. सोनेगाव राजा) असून महेंद्र आनंदराव ढोले यांच्या सांगण्यावरून रेती वाहतूक करत असल्याची माहिती समोर आली.
पंचासमक्ष पोलिसांनी दोन्ही वाहने, ट्रॉली व रेती असा एकूण १२,५५,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी मंगेश सिंधुजी घुरघुसे, विकास कृष्णाजी चिखलकार, राहुल त्रिंबक महल्ले व महेंद्र आनंदराव ढोले यांच्याविरुद्ध वडोदा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२), ४९ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम ४८(८), खाण व खनिज अधिनियम कलम ४ व २१ आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा १९८४ कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरातील अवैध रेती उत्खननावर पोलिसांनी लगाम लावण्याचा इशारा दिला असून पुढील तपास वडोदा पोलीस करत आहेत.