नागपूर १० – न्यू कैलास नगर येथील कुशीनारा बुद्ध विहाराचे संचालक डॉक्टर भदंत धम्मोदय महाथेरो यांनी आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा पर्यंत वर्षावासाला प्रारंभ केलेला आहे. भंते धम्मोदय हे मागील 14 वर्षापासून न्यू कैलास नगर येथील कुशीनारा बुद्ध विहारात बुद्ध विहार समिती, महिला मंडळ, त्रिरत्न धम्मोराईज मिशन, तथागत धम्म प्रचार संघ, कुशीनारा बुद्ध विहार चारिटेबल ट्रस्ट आदींच्या माध्यमातून धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक कार्य नियमितपणे करीत असतात.
अखिल भारतीय भिक्खू संघाचे विदर्भप्रांत अध्यक्ष भंते प्रियदर्शी महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात वर्षावास पर्व प्रारंभ करण्यात आले. तथागत बुद्धाच्या धम्मात वर्षावासाला अत्यंत महत्त्वाचे स्थान देण्यात आले असून भिक्षु संघ तीन महिने (पावसाळा) एका ठिकाणी राहुन दररोज समाजाचे प्रबोधन करीत असतो. त्यामुळे भिक्खूंच्या व नागरिकांच्या जीवनात वर्षावासाचे महत्त्व अनन्य साधारण असल्याचे भंते प्रियदर्शी यांनी सांगितले.
कुशिनारा बुद्ध विहारात दररोज सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान भंते डॉ धम्मोदय हे परितदेशना व ध्यान भावनेवर तीन महिने मार्गदर्शन करतील. वर्षावास प्रारंभ कार्यक्रमा ला भंते प्रियदर्शी, भन्ते डॉ धम्मोदय, भंते शोबिडा त्रिपुरा, भंते विनयकीर्ती, भंते सुमंगल, भन्ते तिस्स, भिक्षुनी आम्रपाली आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुशिनारा बुद्ध विहार चारिटेबल ट्रस्टचे उत्तम शेवडे ह्यांनी तर कुशिनारा बुद्ध विहार समितीचे रमेश पाटील यांनी समारोप केला. याप्रसंगी परिसरातील उपासक उपासिका व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




