spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राज ठाकरेंकडून सुवर्णपदकविजेत्या मराठी खेळाडूचा अपमान

– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची खरमरीत टीका

मुंबई :- राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी नाशिक येथे गेलेले राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकविजेते खेळाडू दिलीप गावित यांनी अडीच ते तीन तास वाट पाहिल्यानंतरही राज ठाकरे यांनी त्यांना भेट दिली नाही. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मी दहीहंडी नाही, तर मटणहंडीला पसंती देतो, असे म्हणणाऱ्यांकडे राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची हंडी फोडणाऱ्या खेळाडूसाठीही वेळ नसेल तर आपली चॉईस ही मटण हंडी, दहीहंडी नाही आणि सुवर्णपदकाची हंडीही नाही, हे महाराष्ट्र ओळखतो आहे. या घटनेतून त्यांना सुवर्णपदकविजेत्या मराठमोळ्या खेळाडूचा अपमान करायचा होता, हेच स्पष्टपणे दिसून येते, अशी खरमरीत टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज ठाकरे सातत्याने मराठीचा मुद्दा रेटत असतात. महाराष्ट्रात मराठी शिकली पाहिजे, मराठी आली पाहिजे, असे सातत्याने राज ठाकरे भाषणातून बोलतात. मराठी माणसासाठी आंदोलन करत असल्याचा दावाही ते करतात. त्यामुळे आपली दोन्ही मुले कुठल्या माध्यमामध्ये शिकली, हे एकदा राज ठाकरे यांनी माध्यमांसमोर येऊन सांगितले पाहिजे. ज्या बॉम्बे स्कॉटीश स्कूलमध्ये राज ठाकरे यांची दोन्ही मुले शिकली ती मराठी शाळा होती का ? त्यांना मराठीचे धडे दिले होते का, हे एकदा महाराष्ट्राला सांगावे आणि मगच भाजपाबद्दल प्रश्न विचारावेत. बहुतांश भाजपा नेत्यांची मुले महाराष्ट्रात, भारतात शिकतात. देवेंद्रजींची मुलगी महाराष्ट्रात शिकते. काही अपवाद निश्चित असतील. परंतु मराठीची अस्मिता आणि मराठीचा झेंडा खांद्यावर घेऊन आपण आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवले, असा सवाल बन यांनी उपस्थित केला.

राज ठाकरे यांनी भाजपातील अंतर्गत वाद शोधण्यापेक्षा आपल्या पक्षाच्या वाताहतीकडे लक्ष दिले तर जास्त सोयीचे होईल, असे सांगून बन म्हणाले यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीला राज ठाकरे उबाठा गटासोबत युती करून लढले. गेल्या वेळी राज ठाकरेंच्या पक्षाच्या महापालिकेत सात जागा निवडून आल्या होत्या. यावेळेला युतीमध्ये लढूनही एक जागा कमी आली. नाशिक, पुणे या महापालिकांमध्ये तर भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे राज ठाकरेंना माझी नम्र विनंती आहे की, भाजपाच्या अंतर्गत बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या पक्षात उबाठा गटासोबत काय सुरू आहे, या अंतर्गत बाबीकडे लक्ष द्यावे.

या देशातील तरुणाई पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबतच आहे. प्रथमच मतदान करणाऱ्या तरुणांनी 2014, 2019 आणि 2024 मधील निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीना पसंती दिली होती आणि आता 2029 मध्येही देणार आहेत. राज ठाकरे यांनी मधल्या काळात जेन झीच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांचे आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे यांना आता अमित ठाकरे यांचे करिअर सेट करायचे आहे. त्यासाठी ते आपल्याला विद्यार्थ्यांची चिंता आहे, असे दाखवतात. मात्र खऱ्या विद्यार्थ्यांची चिंता ना मनसेला आहे, ना उबाठा गटाला आहे, अशी टीका बन यांनी केली.

Popular Articles