– उद्धव ठाकरे, संजय राऊतांना सत्तेसाठीच राज ठाकरेंची आठवण झाली
– भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे टीकास्त्र
मुंबई :- शिवसेनेचे पक्षप्रमुख पद आपल्याला मिळावे यासाठी राऊतांचा आटापिटा सुरू आहे. त्यांना उबाठा गट ताब्यात घ्यायचा आहे. उबाठा गटात ‘मी म्हणेन ती पूर्व दिशा’ यानुसार कारभार चालतो या आविर्भावात ते वागत आहेत. राऊत हे उबाठा गटाचे प्रतिपक्ष प्रमुख असल्याच्या आवेशात हर्षवर्धन सपकाळ यांना, राहुल गांधींना, काँग्रेसला, शरद पवारांना, तर कधी राज ठाकरेंना सल्ला देतात. म्हणूनच आज बेधडकपणे महाविकास आघाडी ही केवळ विधानसभेसाठी होती असे म्हणत महाविकास आघाडी संपवण्याची घोषणा राऊतांनी केली अशी टीका भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शनिवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आणि प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ उपस्थित होते. स्वत:च्या ताकदीवर सत्ता मिळवण्याची खात्री नसल्याने उद्धव ठाकरेंना, संजय राऊतांना राज ठाकरेंची आठवण झाली असून सत्तेसाठीचा त्यांचा संयुक्त लढा मतदार यशस्वी होऊ देणार नाहीत, असेही बन म्हणाले.
दीपोत्सव वर बोलताना बन म्हणाले की, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची ज्योत पेटवली होती तर उद्धव ठाकरे यांनी ही हिंदुत्वाची ज्योत विझवण्याचे काम केले. त्यामुळे हा दीपोत्सव नव्हता. उद्धव ठाकरे यांनी जनतेची दिशाभूल करून राजकारणात अंध:कार पसरवण्याचे काम केले आहे अशी प्रखर टीका बन यांनी केली.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखी स्थिती आज आहे या राऊतांनी केलेल्या टीकेवर पलटवार करत बन म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राचा लढा मराठी माणसासाठी मराठी माणसाने दिलेला लढा होता तर तुमचा लढा हा स्वबळावर लढण्याची पात्रता नसल्याने संयुक्त खुर्ची मिळवण्यासाठीचा लढा आहे. सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी राज ठाकरे यांच्याशी तुम्ही सूत जुळवत आहात, असेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्रात गुंतवणूक करून राज्याच्या विकासाला चालना देणा-या उद्योगपतींबद्दल बोलण्याचा अधिकार राऊतांना आणि उबाठा गटाला नाही. महापालिकेत सत्तेत असताना कुठल्या परभाषीय लोकांना कंत्राटे दिली होती याची यादी आम्ही दाखवली तर राऊतांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही असा इशारा बन यांनी दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा स्वच्छ असून कारभार पारदर्शक आहे. त्यांच्यावर बिनबुडाची टीका कराल तर कशा पद्धतीने तुम्ही महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रवासियांना लुटले, कशा पद्धतीने बिल्डरांना हाताशी घेऊन भूखंडांचे श्रीखंड फस्त केले, कशा पद्धतीने अलिबागचे सातबारे स्वतःच्या नावाने केले, पत्राचाळ घोटाळ केला याचा पूर्ण हिशोब जनतेसमोर मांडेन. मग मात्र तुमची पळता भुई थोडी होईल असा इशारा बन यांनी दिला.
मराठा समाजाच्या मोर्चाला मूका मोर्चा, जरांगे पाटील आणि मराठा समर्थकांना ढेकूण म्हणत अपमान करण्याचे पाप करणारे, ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवण्याचे पाप करणारे राऊत आणि उबाठा गट जातीपातीत तंटे लावत आहेत. मराठा समाज आणि ओबीसी समाजाचे भले त्यांनी कधीही चिंतले नाही असे बन यांनी नमूद केले.
तुमच्या पक्षात घराणेशाही ; तुमच्या पक्षाला पोराबाळांची तर आम्हाला कार्यकर्त्यांची चिंता
आपल्या पक्ष कार्यकर्त्यांची, दुसऱ्यांच्या पोराबाळाची चिंता तुम्हाला नसते. भारतीय जनता पार्टीला सर्वसामान्य कार्यकर्त्यांची चिंता असते असे म्हणत बन यांनी राऊतांच्या टीकेला जोरदार उत्तर दिले. उबाठा गट, काँग्रेस, शरद पवार यांच्या पक्षात घराणेशाही चालते. आमच्या पक्षात लोकशाही आहे. तुमच्या पक्षाला आणि तुम्हाला तुमच्या पोराबाळांचीच चिंता आहे, आम्हाला सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आणि जनतेची चिंता आहे त्यामुळेच आम्ही मुंबईचा विकास करतो.




