सीटूच्या आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी भर पावसात काढला विशाल मोर्चा
नागपूर १० : आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सी आय टी यु) तर्फे आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सी आय टी यू) नागपूर जिल्हा तर्फे आज खंडोबा देवस्थान, सुभाष रोड येथून कॉ.राजेंद्र साठे व प्रिती मेश्राम यांच्या नेतृत्वामध्ये विशाल मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. केंद्र व राज्य सरकारने निर्माण केलेले संकट. आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना जानेवारी २०२५ पासून केंद्राचे कोणतेही मानधन मिळालेले नसुन राज्य किंवा जिल्हा प्रशासन सकारात्मक उत्तर द्यायला तयार नाही. राज्य शासनाचे सुद्धा मानधन मार्च २०२५ पासून थकीत असून त्यावर सुद्धा राज्य शासन तोडगा काढायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये आशा वर्कर वर विविध प्रकारचे सर्वे ऑनलाइन करून देण्याच्या दबाव व परिवारावर आलेली उपासमारीची पाळी त्यामध्ये त्या संकटात सापडलेल्या आहेत. वरिष्ठ अधिकारी किंवा कर्मचारी आशा वर्कर व गटप्रवर्तक यांचेवर कामाचा ताण देत असून त्या विविध रोगाने ग्रस्त झालेले आहेत. आशा वर्कर वर ऑनलाइन कामाची सक्ती न करता ऑनलाइन कामाकरता डाटा ऑपरेटरची नेमणूक करण्यात यावी. दर सहा महिन्याने त्यांची आरोग्य तपासणी होणे गरजेचे असून दर महिन्याच्या एक तारखेला केंद्र व राज्याचे मानधन त्यांच्या खात्यामध्ये जमा होणे गरजेचे आहे. १३ जुन २०२५ रोजी आरोग्य सेवा व आयुक्त अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यातर्फे परिपत्रक क्रमांक राआअ/आशा/आशा अद्यावत मा. सु./२७१०९-३१४ काढण्यात आले वरील परिपत्रकात आशा स्वयंसेविका ही शासकीय कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी नसून ही स्वयंसेविका म्हणून कार्यरत आहे असे वरील पत्रात नमूद केलेले आहे. विधवा, घटस्फोटित किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विवाहित महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून नेमणूक करण्यात आली. परंतु नेमणूक करताना अधिक शिक्षणाला महत्त्व देण्यात येत आहे त्यामुळे गरजू महिलांना लाभांपासून वंचित राहावे लागते. स्वयंसेविका ही जेव्हा पर्यंत काम करण्यास सक्षम असेल तेव्हापर्यंत तिला काम करण्याची मुभा आहे. परंतु नवीन परिपत्रकामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र तर्फे आशा स्वयंसेविका यांची वयोमर्यादा ६० वर्ष निश्चित केली आहे. स्वयंसेविका म्हणून काम करणाऱ्या आशा वर्कर यांना वयोमर्यादा कोणत्या आधारावर लागू होतं? अल्प मानधनावर काम करणारी आशा स्वयंसेविका त्या मानधनावर त्यांच्या प्रपंच योग्य प्रकारे चालू शकत नाही तर कार्य समाप्तीनंतर उपजीविका कशी चालवणार?आशा स्वयंसेविका यांच्यावर ६० वर्षाची वयोमर्यादा लादल्या जात असेल तर, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा अन्यथा कार्य समाप्तीनंतर ५ लाख रुपये एक मुस्त राशी व १० हजार रुपये मासिक पेन्शन लागू करावे. आपणासोबत वारंवार पत्रव्यवहार व संवाद केल्यानंतर सुद्धा कोणताही ठोस निर्णय घेतल्या जात नाही. राज्य शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन करताना गटप्रवर्तक यांना समायोजनातून डावलण्यात आले आहे. त्यांना तात्काळ समायोजित करण्यात यावे, आशा योजना तात्पुरत्या स्वरूपाची असल्यामुळे त्या योजनेला स्थायी योजना म्हणून घोषित करण्यात यावी, जे एस वाय अंतर्गत आशा वर्कर यांच्यावर लादण्यात आलेली ए पी एल / बी पी एल ची अट रद्द करून सरसकट मोबदला देण्यात यावा. अशी मागणी करण्यात आलेली आहे. मोर्चाला प्रामुख्याने कॉ. राजेंद्र साठे प्रीती मेश्राम, लक्ष्मी कोतेजवार, रंजना पौनीकर, माया कावडे, सरिता धोटे, मंदा गंधारे, प्रतिमा डोंगरे, उज्वला कांबळे, सुकेशींनी उमरेडकर, विजेता नितनवरे, मंगला बागडे, गीता विश्वकर्मा, सरिता ठवरे, अर्चना ठाकरे, मोनिका गेडाम प्रामुख्याने उपस्थित होत्या.




