Home Latest News विषमुक्त शेतीचा संकल्प; दशपर्णी अर्क

विषमुक्त शेतीचा संकल्प; दशपर्णी अर्क

0
45

◼️शेतकऱ्यांचा नैसर्गिक कीटकनाशक मित्र दशपर्णी अर्क 

◼️नारी महिला शेतकरी गटातील महिलांचा अभिनव उपक्रम

◼️दशपर्णी अर्क : एक पाऊल विषमुक्त शेतीकडे 

सचिन चौरसिया, रामटेक :- आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे विविध वस्तूंच्या पुरवठा सेवा विस्कळीत झाल्या आहेत. याचा थेट परिणाम कृषी क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत पावसाळ्याला सुरुवात होणार असल्याने शेतकरी खरीप हंगामाच्या मशागतीच्या कामाला लागले आहेत. मात्र यंदा खतांचा पुरेसा पुरवठा होईल की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील ग्रा.पं. नगरधन अंतर्गत येणाऱ्या उमेदचा नारी महिला शेतकरी गटातील महिलांनी पुढाकार घेत पारंपारिक पद्धतीने सेंद्रिय कीटनाशक खाद ‘दशपर्णी अर्क’ तयार केला आहे. स्थानिक उपलब्ध वनस्पती, शेणखत व नैसर्गिक घटकांचा वापर करून हा अर्क तयार केला असून, रासायनिक खतांच्या वाढत्या टंचाईवर पर्याय म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.

महिला शेतकऱ्यांच्या या प्रयत्नामुळे कमी खर्चात सेंद्रिय शेतीला चालना मिळणार असून पर्यावरणपूरक शेतीसाठीही हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात खत व इंधन संकट असताना महिला बचत गटाने दाखविलेली दूरदृष्टी इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. रासायनिक खतांच्या तुलनेत दशपर्णी अर्कामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते तसेच पिकांवरील कीड नियंत्रणातही हा उपाय प्रभावी ठरत आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामात अनेक शेतकरी सेंद्रिय पर्यायांकडे वळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी सरपंच माया दमाहे, उपविभागीय कृषी अधिकारी ग्रीष्मा डेहने, तालुका कृषी अधिकारी सुनील कोरटे, प्रभाग समन्वयक अमोल मरस्कोल्हे, कृषी सहाय्यक विजयसिंग काळे, विशाल लबडे सहाय्यक कृषी सहाय्यक पिपरीया, पाणी फाउंडेशनचा नेहा बांते, राजेश सावके, सिआरपी सीमा बिरनवार, कृषी सखी बिंदुमती बिरनवार, जयश्री सरोदे, माधुरी बोरकर, प्रीती राठोड, कल्पना येळणे, सुरेखा बंधाटे, भारती बोरकर, सविता सरोदे महिला शेतकरी गटाच्या सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

सेंद्रिय क्रांतीकडे नेणारे प्रभावी साधन ; दशपर्णी अर्क

दशपर्णी अर्काचा वापर पिकांवरील रसशोषक कीड, फुलकिडे, तुडतुडे, खोडकिडा, भुरी अशा प्रकारच्या किडींवर परिणामकारक ठरतो. नियमित फवारणी केल्यास या कीटकांचा प्रादुर्भाव टाळता येतो. कीटकनाशकांचा प्रतिकूल परिणाम न होता पिके निरोगी राहतात. या अर्कामुळे जमिनीतील पोषक द्रव्ये जपली जातात. जमिनीतील उपयोगी जिवाणूंचे संवर्धन होते. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते. दशपर्णी अर्काची दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे दशपर्णी अर्क शेतकऱ्यांसाठी अत्यंत स्वस्त आणि किफायतशीर आहे. दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी लागणाऱ्या वनस्पती आणि इतर घटक गावाच्या परिसरातच उपलब्ध होतात. दशपर्णी अर्काची दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे दशपर्णी अर्क शेतकऱ्यांसाठी अत्यंत स्वस्त आणि किफायतशीर आहे. दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी लागणाऱ्या वनस्पती आणि इतर घटक गावाच्या परिसरातच उपलब्ध होतात. जैवविविधता जपण्यासाठी अशा जैविक कीटकनाशकांचा वापर आवश्यक आहे. यामुळे शेतीतील सेंद्रिय दृष्टिकोन बळकट होतो. उत्पादन टिकाऊ राहते. जमिनीचा पोत सुधारतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अन्नधान्य मिळते आणि एकूण शेती क्षेत्र अधिक शाश्वत होते. या सर्व बाबी लक्षात घेता दशपर्णी अर्काचा वापर हा केवळ एक सेंद्रिय पर्याय न राहता सेंद्रिय क्रांतीकडे नेणारे एक प्रभावी साधन ठरते. शेतकऱ्यांनी पारंपरिक अनुभवातून शिकून आधुनिक सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करताना या प्रकारच्या अर्कांचा अवलंब मोठ्या प्रमाणावर करावा.

दशपर्णी बनवण्यासाठी लागणारे घटक

दशपर्णी अर्क हा शेतीमध्ये वापरला जाणारा एक नैसर्गिक जैविक कीटकनाशक आणि बुरशीनाशक अर्क आहे. ‘दशपर्णी’ म्हणजे १० प्रकारच्या कडू औषधी वनस्पतींच्या पानांपासून तयार केलेला अर्क आहे. दशपर्णी अर्कात सामान्यता कडुनिंब, करंज, सीताफळ, टनटनी (घाणेरी), रुई, पांढरा धोतरा, पपई, निरगुडी, लाल कण्हेर, गुळवेल व इतर कडू पाने तसेच यामध्ये गोमूत्र, लसूण, हिरवी मिरची यांचे मिश्रण करून हा अर्क प्रभावी बनवला जातो.