नागपूर, ०३ : नागपूर हेरीटेज संवर्धन समितीद्वारा शहरातील विविध हेरीटेज कामांचा आढावा घेण्यात आला. शहरातील विविध भागातील वारसा स्थळांच्या संदर्भात बुधवारी (ता.२) नागपूर हेरीटेज संवर्धन समितीची बैठक समितीचे अध्यक्ष अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभा कक्षात झालेल्या बैठकीत मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, मनपाचे मुख्य अभियंता मनोज तालेवार, समितीच्या सदस्या डॉ. मधुरा राठोड, डॉ. लीना रामकृष्णन, एएसआयचे अरुण मलिक, नगर रचना विभागाचे उपसंचालक आशिष मोरे, सहायक संचालक ऋतुराज जाधव, नगर रचना विभागाचे सहसंचालक विजय शेंडे, पावन पाटील, आरएलडीएचे प्रतीक कृष्णा, कार्यकारी अभियंता अश्विनी एलचटवार, डॉ. संजय ठाकरे प्रशांत भांडारकर यांच्यासह रेल्वे, एएसआय, एनआयटीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत नागपूर शहरातील महत्त्वाच्या ऐतिहासिक आणि हेरिटेज स्थळांच्या सुशोभिकरण, पुनर्विकास आणि नवीन बांधकामांशी संबंधित अनेक प्रस्तावांवर हेरिटेज संवर्धन समिती चर्चा करण्यात आली. यात राजे बख्त बुलंदशहा समाधी स्थळाचे सौंदर्यीकरण, नागपूर रेल्वे स्थानक इमारतीचे पुनर्विकास, रेल्वेच्या शताब्दी उत्सव, शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्थेतील नवीन बांधकाम, मुंशी मंदिर, सोनेगाव तलाव, काशीबाई टेम्पल कॉम्पलेक्सच्या डॉक्युमेंटेशन प्रपोजल, एजी कार्यालय इमारत, राजीव गांधी सद्भावना दौड, कस्तुरचंद पार्क मैदानातील रावण दहन परवानगी, श्रीमंत राजे रघुजीराव भोसले महाल नवीन टाऊन हॉल कार्य या सर्व प्रस्तावांवर हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत रेल भूमी विकास प्राधिकरणाद्वारे संगणकीय सादरीकरण करीत नागपूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास आणि दुरुस्ती कामासंदर्भात माहिती सादर करण्यात आली. यावेळी कामावर समितीने समाधान व्यक्त केले. तसेच राजीव गांधी सद्भावना दौड आणि कस्तुरचंद पार्क मैदानातील रावण दहन कार्यक्रमाला परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.




