किशोर साहू, मौदा :- गुरुवार (ता.२३ जुलै) रोजी खरडा येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान २०२६-२७ अंतर्गत श्री पद्धतीने भात लागवड प्रकल्प आधारीत शेतकरी प्रशिक्षण सत्र १ घेण्यात आले. सदर शेतकरी प्रशिक्षणात पंकज ठेंगणे, प्रभारी मंडळ कृषी अधिकारी, निमखेडा यांनी धान लागवडीच्या विविध सुधारित पद्धती, श्री पद्धत, यांत्रिकी पद्धतीने भात लागवड, रोपवाटिका व्यवस्थापन, रोवणी तंत्रज्ञान, एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन, खतांचा संतुलित वापर, अझोला निर्मिती इत्यादी विषयी माहिती दिली. धान व मिरची पिकातील प्रमुख आव्हाने यांविषयी संवाद साधला तसेच मनोज अडे यांनी सेंद्रिय खतांचा वापर, रस शोषक किड नियंत्रण, मिरची, भेंडी लागवड इत्यादी विषयी माहिती दिली.
बसवराज सिंहासन यांनी खरीप पीक स्पर्धा, पीक विमा योजना,प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनाबाबत माहिती दिली. पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांनी भरावयाचे विमा हफ्ता रक्कम, निकष, उंबरठा उत्पन्नबाबत माहिती देऊन सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी प्रकल्प अंतर्गत सर्व लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.





