spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वन्यप्राण्यांसाठी जीवघेणे रस्ते; अपघातात आणखी एका बिबट्याचा बळी

चंद्रपूर :- जंगलालगतचे रस्ते वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात रस्ते अपघातात सातत्याने वन्यप्राण्यांचे मृत्यू होत आहे. यात चितळ, कोल्हा, अस्वल यासह आता वाघ आणि बिबट देखील अपघाताचे बळी ठरत आहेत. चिचपल्ली-जुनोना रस्त्यावर आज अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला.

घटना नेमकी काय

चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना जंगलाला लागून चिचपल्ली-जुनोना रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटाच्या सुमारास रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला एका अज्ञान वाहनाची धडक बसली. ही धडक एवढी जोरदार होती की घटनास्थळीच बिबट्याचा मृत्यू झाला. वनविकास महामंडळाच्या अखत्यारितील हे वनक्षेत्र आहे. बिबट्याचे वय अवघे चार ते सहा महिन्याच्या दरम्यान आहे. आईसोबत रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने त्याला धडक दिली असावी, असा अंदाज आहे. बिबट्याच्या बछड्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

हे वनक्षेत्र नेमके कसे

जुनोना जंगलालगत असलेला बाबुपेठ-जुनोना-बल्लारशाह, जुनोना-चिचपल्ली व पोंभुर्णा हा संपूर्ण ४२ किलोमीटर आणि बाबुपेठ-चिचपल्ली २६ किलोमीटरचा रस्ता संपूर्ण जंगलातून जातो. जंगलालगतचा रस्ता असल्याने या मार्गावर नेहमी वन्यप्राण्याचा वावर आढळतो. त्यामुळेच या मार्गावर गतीरोधकांची मागणी हॅबिटॅट कंझर्वेशन सोसायटी संस्थेतर्फे करण्यात आली होती. ताडोबाच्या बफर क्षेत्रात पदमापूर ते मोहर्ली गतिरोधकचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधला आहे. मग तिथले वन्यप्राणी महत्वाचे आणि जुनोना जंगलातील वन्यप्राणी मागासलेले असा दुजाभाव का, असा प्रश्न हॅबिटॅट कंझर्वेशन सोसायटीने उपस्थित केला.

हॅबिटॅट कंझर्वेशन सोसायटी काय करते

हॅबिटॅट कंझर्वेशन सोसायटी ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या वन्यप्राण्यांच्या शास्त्रीय नोंदी ठेवण्याचे कार्य करत आहे. त्या शासनासोबत समन्वय साधून संदर्भात उपाय योजना सुचवीण्याचे कार्य करत आहे. हॅबिटॅट कंझर्वेशन सोसायटीने सार्वजनिक बांधकाम विभागासोबत अनेकदा पत्रव्यवहार करून गतिरोधकाची मागणी केली. मात्र, अजूनही ह्या रस्त्यावर गीतरोधक लावण्यात आले नाही. ते लावले असते तर बिबट्याचा मृत्यू थांबवता आला असता. या मार्गावर ८०च्या गतीने वाहने धावत असतात. आतापर्यंत या रस्त्यावर वाघ, बिबट, अस्वल, चितळ अशा अनेक वन्यजीवांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

घटनस्थळी कोण

घटनेची माहिती मिळताच हॅबिटॅट कंझर्वेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे, अभिषेक गजभे, जयेश पटेल, वनविकास महामंडळातील अधिकारी कदम, जुनोना वनपरिक्षेत्र अधिकारी मेश्राम, चिचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी बोथे, फिरते पथकचे वनपरिक्षेत्र अधिकारी घोरपडे, कांबळे, परियार व वनमजूर उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.