स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण यांची दमदार कामगिरी
उमरेड २९ : उमरेड शहरात एका वृद्ध नागरिकाच्या गळ्यातील सोन्याचा गोफ हिसकावून चोरट्याने पलायन केलेल्या घटनेचा अवघ्या चार तासांत पर्दाफाश करत, नागपूर ग्रामीण जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कामगिरी केली आहे. या कारवाईत १ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
७५ वर्षीय नारायण कृष्णराव लाडे, रा. प्लॉट क्र. ५०, विकास कॉलनी, उमरेड हे दिनांक २७ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास घराबाहेर कचरा टाकण्यासाठी गेले होते. याचवेळी एक अज्ञात इसम मोटारसायकलवरून येत त्यांच्या गळ्यातील सोन्याचा गोफ हिसकावून पळून गेला. या घटनेची नोंद उमरेड पोलीस स्टेशनमध्ये कलम ३९२ भा.दं.वि. अंतर्गत (अपराध क्रमांक ६४०/२०२५) करण्यात आली होती.
गुन्हा घडताच स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण यांच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. गुप्त माहितीदारांची मदत आणि तांत्रिक पद्धतीचा वापर करून फक्त चार तासांत संशयित आरोपीचा शोध घेत चंद्रपूर जिल्ह्यातून मन्नुसिंग उर्फ जनरेलसिंग रामसिंग टाक (वय ४५, रा. समता नगर, नेरी दुर्गापूर) याला ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आरोपीकडून १२.५४० ग्रॅम वजनाचा, सुमारे १,००,०००/- रुपये किंमतीचा सोन्याचा गोफ जप्त करण्यात आला आहे.
जप्त मुद्देमाल आणि आरोपी यास उमरेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास उमरेड पोलिसांकडून सुरू आहे.
@filephoto




