– अतिवृष्टीग्रस्त, नागरिकांचे जनजीवन पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न
मुंबई :- राज्यात विक्रमी पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी शासन युद्धपातळीवर काम करत असून अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना आवश्यक उपाययोजनांसाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून गरजेनुसार अतिरिक्त निधीही उपलब्ध करून दिला जाणार आहे. विधानसभेत राज्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थिती बाबत करण्यात आलेल्या चर्चेला उत्तर देताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन बोलत होते.
मंत्री महाजन म्हणाले की, एल निनोच्या परिणामामुळे राज्यात विक्रमी पाऊस झाला. काही भागांत दोन दिवसांत ६०० मिमीपर्यंत, तर एका दिवसात ४०० ते ५०० मिमी पावसाची नोंद झाली. रायगड, रत्नागिरी, पालघर, वसई-विरार, मुंबई आणि नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली, तर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नगर परिसरात अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे.
मुंबईत मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि भरतीमुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. ताशी ७० ते ९० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर झाडे पडली. झाडे पडण्यामागील कारणांचा तज्ज्ञ समितीमार्फत अभ्यास करून भविष्यात सुरक्षित वृक्षलागवडीसाठी उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
मानखुर्द येथील दुर्घटनेनंतर स्वतः घटनास्थळी भेट दिल्याचे सांगत मंत्री महाजन यांनी, सहा जणांचा मृत्यू झालेल्या या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. पालघर, वसई-विरार आणि नाशिकसह विविध जिल्ह्यांत प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीचा आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले.
पूरग्रस्तांसाठी शाळा, धर्मशाळांमध्ये निवाऱ्याची व्यवस्था, अन्न, पिण्याचे पाणी व्यवस्था करण्यात आली असून तांदूळ, गहू, तेल, साखर, मीठ आदी जीवनावश्यक वस्तूंची किट वितरित करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या भागांमध्ये वादळामुळे वीजपुरवठा आणि मोबाईल सेवा विस्कळीत झाल्याने दूरसंचार कंपन्यांशी समन्वय साधून सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मिसिंग लिंक प्रकल्पाचे कोणतेही नुकसान झाले नसून डोंगरावरील पाण्याचा प्रवाह प्रकल्पाबाहेरील भागातून गेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात आतापर्यंत ६३ जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या वारसांना नियमाप्रमाणे चार लाख रुपयांची मदत दिली जात आहे. मात्र ही मदत वाढविण्याबाबत सभागृहाने निर्णय घेतल्यास शासन सकारात्मक विचार करेल, असेही महाजन यांनी सांगितले.
संकटकाळात आरोप-प्रत्यारोप न करता नागरिकांना मदत करून त्यांचे जनजीवन पूर्ववत करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.




