spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

परभणी-मुदखेड रेल्वे मार्गाच्या आधुनिकीकरणासाठी १६३ कोटी मंजुर

– ‘वंदे भारत’सह मालवाहतुकीलाही मिळणार गती

नवी दिल्ली :- भारतीय रेल्वेने दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील परभणी-मुदखेड दुहेरी रेल्वे मार्गाच्या आधुनिकीकरणासाठी महत्त्वाचा निर्णय घेताना १६३ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाअंतर्गत मार्गावरील विद्यमान इलेक्ट्रीक ट्रॅक्शन (विद्युत पुरवठा) प्रणालीचे संपूर्ण आधुनिकीकरण करण्यात येणार असून, त्यामुळे या मार्गावरील प्रवासी तसेच मालवाहतूक रेल्वेची क्षमता आणि गती दोन्हीमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. विशेष म्हणजे, भविष्यात ‘वंदे भारत एक्स्प्रेस’सारख्या वेगवान रेल्वेगाड्यांचे अधिक कार्यक्षम संचालन करण्यासाठीही हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

या प्रकल्पांतर्गत सुमारे १६४ ट्रॅक रेल्वे मार्गावर सध्या कार्यरत असलेली १x२५ केव्ही इलेक्ट्रिक ट्रॅक्शन प्रणाली बदलून अत्याधुनिक आणि अधिक क्षमतेची २x२५ केव्ही प्रणाली बसविण्यात येणार आहे. त्याचबरोबर वाढीव वीजभार हाताळण्यासाठी आवश्यक असलेल्या वीज पुरवठा यंत्रणा, उपकेंद्रे आणि संबंधित पायाभूत सुविधांचेही आधुनिकीकरण केले जाणार आहे. यामुळे रेल्वेगाड्यांना अधिक स्थिर आणि अखंड वीजपुरवठा उपलब्ध होईल, तसेच रेल्वे वाहतुकीतील अडथळे कमी होण्यास मदत होईल.

परभणी-मुदखेड रेल्वे मार्ग हा भारतीय रेल्वेच्या ‘हायली युटिलाइज्ड नेटवर्क’ (एचयूएन रूट-९) मधील अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो. हा मार्ग अजमेर, इंदूर, खंडवा, अकोला, पूर्णा, मुदखेड, सिकंदराबाद, मेहबूबनगर आणि धोन यांसारख्या प्रमुख शहरांना आणि औद्योगिक क्षेत्रांना जोडतो. त्यामुळे या मार्गावरील क्षमतावाढीचा थेट लाभ प्रवासी वाहतूक, उद्योग आणि व्यापार क्षेत्रालाही होणार आहे.

या आधुनिकीकरणामुळे उच्च वेगाच्या रेल्वेगाड्या अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम पद्धतीने धावू शकतील. तसेच मालवाहतूक रेल्वेची वहनक्षमताही वाढणार असल्याने भारतीय रेल्वेने २०२९-३० पर्यंत ३,००० दशलक्ष टन मालवाहतुकीचे निर्धारित केलेले उद्दिष्ट गाठण्यास मोठी मदत होणार आहे. वाढत्या रेल्वे वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांची क्षमता वाढविण्यासाठी आणि आधुनिक रेल्वे पायाभूत सुविधा उभारण्यासाठी हा प्रकल्प एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Popular Articles