spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आरटीओ उड्डाणपुलाचे नामकरण ‘ज्ञानयोगी स्व. डॉ. श्रीकांत जिचकर उड्डाणपुल’; बांधकाम अंतिम टप्प्यात, लवकरच उद्घाटन

 

नागपूर १० : नागपूर शहरातील महत्त्वाच्या अमरावती रोडवर (Amravati Road) बांधला जाणारा आरटीओ उड्डाणपुल (RTO Flyover) आता पूर्णत्वाच्या टप्प्यात आला आहे. वाडी पॉईंटचा भाग पूर्ण झाला असून बोले पेट्रोल पंपाजवळील काम जलदगतीने सुरू आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) उड्डाणपुलाचे नामकरणही केले असून हा उड्डाणपुल आता ज्ञानयोगी स्व. डॉ. श्रीकांत जिचकर यांच्या नावाने ओळखला जाईल. पुलावर नावाचे फलकही लावण्यात आले आहेत. लवकरच त्याचे औपचारिक उद्घाटन होणार आहे.

४७८ कोटींचा प्रकल्प, २४५ कोटी खर्च उड्डाणपुलावर
या प्रकल्पाची घोषणा २०२१ साली झाली होती. ५ मार्च २०२२ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. हा उड्डाणपुल अमरावती रोड ट्रॅफिक इम्प्रूव्हमेंट प्रोजेक्ट (ARTIP) चा भाग आहे. संपूर्ण प्रकल्पावर ४७८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी २४५ कोटी रुपये खर्च आरटीओ उड्डाणपुलावर केला जात आहे. ARTIP अंतर्गत वाडी उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून तेथे गेल्या वर्षभरापासून वाहतूक सुरू आहे.

कामात दीड वर्षांचा विलंब
मूळ नियोजनानुसार उड्डाणपुलाचे काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण व्हायचे होते. मात्र तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे सुमारे दीड वर्षांचा विलंब झाला. सध्या पुलाचे संरचनात्मक काम पूर्ण झाले आहे. अंतिम टप्प्यात रंगकाम, रोड मार्किंग, रंबल स्ट्रिप्स व साइनबोर्ड बसविण्याचे काम सुरू आहे. तसेच फुटपाथ, नाले व रिटेनिंग वॉलचे कामही लवकरच पूर्ण होणार आहे.

ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकरांना अभिवादन
उड्डाणपुलाचे नामकरण ज्ञानयोगी स्व. डॉ. श्रीकांत जिचकर यांच्या नावाने करण्यात आले आहे. डॉ. जिचकर हे देशातील सर्वाधिक शिक्षित व्यक्तींमध्ये गणले जात. ते केवळ माजी खासदारच नव्हे, तर समाजसेवक, विचारवंत व विद्वान म्हणूनही ओळखले जात होते. नागपूरकरांसाठी त्यांचे नाव या उड्डाणपुलाशी जोडले जाणे ही अभिमानाची बाब मानली जात आहे.

सप्टेंबरअखेर उद्घाटनाची शक्यता
पुलाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून वाडी एंडचे काम संपले आहे. बोले पेट्रोल पंपाजवळील काम अंतिम टप्प्यात आहे. PWD च्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सप्टेंबरअखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण होणार असून त्यानंतर उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात येईल.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.