– विद्यार्थ्यांचे विभागीय स्तरासाठी निवड; प्राचार्य, प्राध्यापकांकडून अभिनंदन
कामठी :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत आयोजित सर्व वयोगटातील जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत एस. के. पोरवाल कॉलेज, कामठीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या दमदार कामगिरीने कॉलेजचा झेंडा उंचावला आहे.
ही स्पर्धा दिनांक ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान संत तुकडोजी महाराज विद्यापीठ, रवी नगर, नागपूर येथे पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. त्यात एस. के. पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कनिष्ठ गटातील रितिका यादव (वयोगट १९) हिने भालाफेक मध्ये द्वितीय क्रमांक, गोळाफेक व थाळीफेक या दोन्ही प्रकारांमध्ये तृतीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
बुलबुल खरवार (वयोगट १८) हिने हातोडाफेक आणि थाळीफेक दोन्ही प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला.
आयुष जुमडे (वयोगट १७) याने थाळीफेक मध्ये तृतीय क्रमांक मिळवला.तुषार रिठे (वयोगट १९) याने १०० मीटर धावणे मध्ये प्रथम क्रमांक व २०० मीटर धावणे मध्ये द्वितीय क्रमांक मिळवून आपल्या वेगाचा ठसा उमटविला.
तर समीर देशमुख (वयोगट १९) याने ४०० मीटर हर्डल्स मध्ये प्रथम क्रमांक आणि ८०० मीटर धावणे मध्ये तृतीय क्रमांक पटकावला. तसेच कुशाग्र यादव (वयोगट १९) याने भालाफेक मध्ये प्रथम क्रमांक मिळवत कॉलेजसाठी आणखी एक गौरवाची नोंद केली. या यशस्वी कामगिरीसाठी विद्यार्थ्यांचे विशेष मार्गदर्शन प्राध्यापिका डॉ. मल्लिका नागपुरे यांनी केले. कॉलेजचे प्राचार्य डॉ. स्वप्नील दहाट, उपप्राचार्य डॉ. सुधीर अग्रवाल, तसेच पर्यवेक्षक व्ही. बी. वंजारी सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
या उल्लेखनीय यशामुळे एस. के. पोरवाल कॉलेजने जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत आपली भक्कम उपस्थिती नोंदवली असून, कॉलेजचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.




