नागपूर :- एचआयव्ही/एड्स प्रतिबंध, जनजागृती तसेच बाधित व्यक्तींना आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत सह्याद्री संस्था, लिंक वर्कर प्रकल्प, नागपूर यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. निवृत्ती राठोड, सिव्हिल सर्जन, नागपूर आरोग्य विभाग यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एचआयव्ही संसर्गाबाबत जनजागृती करणे, जोखमीच्या गटांपर्यंत पोहोचून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देणे, एचआयव्ही तपासणी व उपचारासाठी मार्गदर्शन करणे तसेच गरजू व्यक्तींना आरोग्यसेवांशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य लिंक वर्कर प्रकल्पाच्या माध्यमातून सातत्याने केले जात आहे. समाजातील विविध घटकांमध्ये एचआयव्ही/एड्सविषयी असलेले गैरसमज दूर करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रकल्पातील कार्यकर्ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत सह्याद्री संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे सह्याद्री संस्था, लिंक वर्कर प्रकल्पातील कर्मचारी व कार्यकर्त्यांमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, एचआयव्ही / एड्समुक्त समाजाच्या निर्मितीसाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या उल्लेखनीय यशाबद्दल सह्याद्री संस्थेचे पदाधिकारी, प्रकल्पातील कर्मचारी, लिंक वर्कर्स तसेच सर्व सहकाऱ्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
एचआयव्ही/एड्स क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सह्याद्री संस्थेच्या लिंक वर्कर प्रकल्पाला पुरस्कार









