spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

५३० कोटी खर्च करून निर्माण केलेल्या नांदगावपेठ-पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गाची थातूरमातूर दुरुस्ती ! 

– निकृष्ट दर्जाची कामे बंद करून दर्जेदार काम करण्याची रुपेश वाळके यांची मागणी !

– सिमेंट रस्त्यावर शेकडो ठिकाणी भेगा, खड्डे; धोकादायक पुलांची कामे अपूर्ण !

मोर्शी, तालुका प्रतिनिधी :- शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून निर्माण केलेल्या नांदगावपेठ–मोर्शी–वरूड–पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे आणि भेगा पडल्या असतांना यामध्ये झालेल्या अपघातामध्ये शेकडो नागरिकांचे बळी गेले असून अनेकांचे संसार उध्वस्त झाले असतांना आता त्याच खड्डे आणि भेगांमध्ये केवळ डस्ट, जळलेले ऑइल व इतर साहित्य टाकून वरवरची दुरुस्ती करून नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा होत असलेला गंभीर प्रकार राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांनी उघडकीस आणला असून राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेली निकृष्ट दर्जाची थातुरमातुर दुरुस्तीची कामे तत्काळ बंद करून खराब झालेल्या सिमेंट रस्त्याची केवळ डागडुजी न करता तांत्रिक पद्धतीने खोदून नव्याने रस्ता तयार करण्यात यावा अशी मागणी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्याकडे केली आहे.

अमरावती जिल्ह्यातील नांदगावपेठ–मोर्शी–वरूड ते मध्यप्रदेशातील पांढुर्णा यांना जोडणाऱ्या सुमारे ९६ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तब्बल ५३० कोटींचा खर्च करून अवघ्या काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या भेगा, खड्डे, रस्ता दबणे आणि पॅनेल खराब होण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नांदगाव पेठ पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावर साडेचार मीटरच्या आसपासचे अनेक सिमेंट पॅनेल तयार करण्यात आले आहेत. या पॅनेलपैकी अनेक ठिकाणी भेगा पडल्याने रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. काही ठिकाणी रस्ता दबल्यामुळे वाहनांना अचानक धक्का बसतो. विशेषतः दुचाकीस्वारांना याचा मोठा धोका निर्माण झाला असून, रात्रीच्या वेळी हे खड्डे आणि दबलेला रस्ता अधिक धोकादायक ठरत आहे. ज्या उद्देशाने जुना खड्डेमय डांबरी रस्ता बदलून कोट्यवधी रुपये खर्च करून सिमेंटचा नवीन राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आला, तोच महामार्ग काही वर्षांत खराब होत असेल तर जबाबदार कोण? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभाग ‘कुंभकर्णी झोपेत’ असल्याचा आरोप नागरिकांतर्फे करण्यात येत असून महामार्गावरील समस्यांबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच संबंधित कंत्राटदाराकडे वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित दखल घेतली जात नसल्यामुळे नागरिकांच्या जीविताशी खेळ सुरूच राहिला तर राष्ट्रीय महामार्गावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांच्यातर्फे राष्ट्रीय महामार्ग विभागाला देण्यात आला आहे.

५३० कोटींच्या कामाची गुणवत्ता तपासा !

नांदगावपेठ ते पांढुर्णा या महामार्गाच्या कामाचे दोन टप्पे करण्यात आले. नांदगावपेठ ते मोर्शी हा सुमारे ४३ किलोमीटरचा टप्पा असून त्यासाठी सुमारे २४० कोटी, तर मोर्शी ते पांढुर्णा हा सुमारे ५३ किलोमीटरचा टप्पा असून त्यासाठी सुमारे २९० कोटी खर्च झाल्याचे सांगण्यात येते.

मात्र एवढा मोठा निधी खर्च करून तयार केलेल्या रस्त्यावर अल्पावधीतच भेगा आणि खड्डे पडत असतील, तर बांधकामाच्या गुणवत्तेची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करण्याची आवश्यकता आहे.

– रुपेश वाळके अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.