Wednesday, April 29, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शंकरपटात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा साकोली पोलिसांकडून पर्दाफाश; भंडारा-गोंदियातील १३ गुन्हे उघडकीस

साकोली :- बैलगाडी शर्यतींच्या (शंकरपट) गर्दीचा फायदा घेऊन दुचाकींची चोरी करणाऱ्या एका सक्रिय टोळीचा साकोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण १३ मोटारसायकली हस्तगत केल्या असून, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील चोरीचे एकूण १३ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

साकोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत आयोजित शंकरपटातून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर साकोली पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवून संशयित आरोपी करणकुमार भोजराज गिर्हेपुंजे (वय ३०, रा. किन्ही/एकोडी, ता. साकोली) आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. त्यांची सखोल विचारपूस केली असता, त्यांनी शंकरपटातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेल्या १३ मोटारसायकलींमुळे जिल्हयातील विविध पोलीस स्टेशनमधील गुन्हे उघड झाले आहेत. यामध्ये साकोली पोलीस स्टेशनमधील ६ गुन्हे, कारधा आणि लाखनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील प्रत्येकी १ गुन्हे (एकूण २), आणि गोंदिया जिल्ह्यातील ५ गुन्हे अशा एकूण १३ गुन्ह्यांचा समावेश आहे. साकोली पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे वाहनधारकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (साकोली) शिवम विसापुरे आणि साकोलीचे ठाणेदार महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक प्रशांत वडूले, पोलीस हवालदार अनिफ राऊत, पोलीस अंमलदार नरेंद्र झलके , धनविजय गणवीर, राहुल गायधने, सचिन राऊत, मंगेश ब्राम्हणकर, टेकचंद बुरडे, गौतम थूलकर आणि महेश नैताम यांचा समावेश होता.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.