– ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे यांच्या हस्ते सपत्नीक गौरव; निर्भीड पत्रकारितेची दखल
यवतमाळ :- मराठा सेवा संघ आणि सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘छत्रपती महोत्सव २०२६’ मध्ये मानाचा तानुबाई बिर्जे पत्रकारिता पुरस्कार दै. ‘पुण्यनगरी’चे जिल्हा कार्यालय प्रमुख संदीप खडेकर यांना प्रदान करण्यात आला. येथील ‘शिवतीर्थ’ वर १८ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या मुख्य सोहळ््यात दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील, उपाध्यक्ष वसंत घुइखेडकर, अर्बन बँकेचे अध्यक्ष नितीन खर्चे, नगरसेविका वैशाली सवाई, मराठा सेवा संघाच्या विद्या खडसे, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर आदी मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे, संदीप खडेकर यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी उज्वला खडेकर यांचाही यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला. संदीप खडेकर हे गेल्या ३० वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहेत. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी जिल्ह्यातील ज्वलंत विषयांना वाचा फोडली. विशेषत: त्यांनी चालवलेल्या ‘वेध गुन्हेगारी’चा या वृत्तमालिकेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. लोहारा परिसरातील खुलेआम देहव्यापार, संघटित गुन्हेगारी, टोळीयुद्ध आणि वनविभागातील भ्रष्टाचाराचे वाभाडे त्यांनी आपल्या लेखणीतून काढले.
केवळ बातम्या न देता, त्यामागील गुन्हेगारीचा मुळासकट शोध घेण्याच्या त्यांच्या धाडसी वृत्तीमुळे प्रशासनाला अनेकदा गंभीर दखल घ्यावी लागली. त्यांच्या याच निर्भीड आणि लोकाभिमुख कार्याचा गौरव म्हणून त्यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ््याला यवतमाळमधील नागरिक, पत्रकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.




