spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

संजय राऊतांनी प्रचारासाठी पाक, बांगलादेशच्या पंतप्रधानांना बोलवावे

– भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची बोचरी टीका  

मुंबई :- हिरव्यांची गुलामी करणा-या उबाठा गट, संजय राऊत यांनी महापालिका निवडणुकीदरम्यान पक्ष प्रचारासाठी पाकिस्तान, बांगलादेशच्या पंतप्रधानांना बोलवावे, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. संजय राऊत हे भारतात राहून देशविरोधी भूमिका घेणारे पाकिस्तानचे प्रवक्ते असून फक्त दलाली करणे हाच राऊतांचा धंदा आहे अशी टीकाही  बन यांनी केली.

यावेळी बन म्हणाले की, भाजपा हिंदुत्वाचा हुंकार भरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आदींना बोलावतो. पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ यांच्यावर सामान्य भारतीय माणसाचे प्रेम आहे. आपल्याच शिवसैनिकांवर मशिदीतून दगडफेक करणाऱ्या राशीद मामू सारख्यांना उद्धव ठाकरे आपल्या पक्षात घेतात. उबाठा गट आणि राऊत यांनी मुस्लीम मतदारांच्या लांगूलचालनासाठी घेतलेली भूमिका महाराष्ट्राने ओळखली असून महाराष्ट्रातील जनता महापालिका निवडणुकीत उबाठा गटाचे पानीपत नक्की करेल असा विश्वासही बन यांनी बोलून दाखवला.

वरातीमागे नाचणा-या राऊतांना अदानी, अंबानींवर टीकेचा अधिकार नाही

अंबानी – अदानींच्या कौटुंबिक लग्नामध्ये वरातीमागे नाचणा-या संजय राऊत यांना अदानी, अंबानी यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. हे दोघेही उद्योगपती राज्यात, देशात उद्योगवाढीचे काम करत आहेत. महाराष्ट्रात तुम्ही एका तरी उद्योगाची निर्मिती केली का, खासदार फंडातून एक तरी जनहिताचे काम केले का याचे उत्तर राऊतांनी द्यावे असे आव्हान बन यांनी दिले.

यावेळी बन म्हणाले की, राऊत, उद्धव ठाकरेंनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडत सोनिया गांधी, राहुल गांधी तसेच अफझलखान, औरंगजेबाचे विचार पुढे नेण्याचे काम करत आहेत. ज्यांनी आपला स्वाभिमान गांधी घराण्याच्या चरणी अर्पण केला त्या राऊतांच्या तोंडी स्वाभिमानाच्या गप्पा शोभत नाहीत अशीही टीका बन यांनी केली. खऱ्या शिवसेनेचा मुद्दाच आता राहिला नाही. ख-या शिवसेनेवर मतदारांनी विधानसभा निवडणुकीवेळीच शिक्कामोर्तब केले आहे. उबाठा गट हा राहुल गांधी यांची उपकंपनी आहे, औरंगजेब फॅन क्लबचा सदस्य उबाठा गट आहे या शब्दांत बन यांनी शरसंधान साधले.

कोण कुणाचे उंबरठे झिजवत आहे हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. कोविड काळात आणि मुख्यमंत्री असताना घराबाहेर न पडणारे उद्धव ठाकरे आता पालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी, जागावाटपासाठी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थाच्या फे-या मारत आहेत असा प्रहार बन यांनी केला.

Popular Articles