– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी डागली तोफ
मुंबई :- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडीया म्हणण्यात काहीही चुकीचे नाही, असे म्हणत काँग्रेसच्या बालिश टीकेचे समर्थन करताना जनाब संजय राऊत यांना लाज वाटली पाहिजे. एका महिलेचा अपमान होत असताना तुम्हाला खरे तर खेद वाटायला पाहिजे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे सातत्याने महाराष्ट्रात ढोंग आणि ढोंगाचे राजकारण करतात. अशा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहांनाही हिणवणार असाल तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे तुम्ही ‘ढोंगी गुड्डा’ आहात, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सुनेत्रा पवार यांच्यावर व्यक्ती म्हणून नव्हे तर उपमुख्यमंत्री म्हणून टीका केली म्हणणाऱ्या संजय राऊत यांना हाच न्याय लावायचा असेल तर नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर व्यक्ती म्हणून नव्हे तर महाराष्ट्राचे नाकर्ते मुख्यमंत्री म्हणून टीका केली होती. कंगना रणौत यांनी तुमच्यावर टीका केली म्हणून त्यांचे घर तोडले होते तेव्हा तुम्हाला व्यक्ती-देश आठवला नव्हता. मोहित कंबोज यांचे घर तोडायला तुम्ही नोटीस पाठवली तेव्हा त्यांनी व्यक्ती म्हणून नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुमच्यावर टीका केली होती. पत्रकार निखिल वागळे यांच्या कार्यालयावर तुम्ही हल्ला का केला होता? लोकशाही मार्गाने त्यांचा निषेध करायला पाहिजे होता. त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. त्या हल्ल्याचे तुम्ही समर्थन करणार आहात का?, अशी प्रश्नांची सरबत्ती बन यांनी केली.
सुनेत्रा पवार या सातत्याने लोकांचे प्रश्न सोडवतात. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे सातत्याने जनतेमध्ये असतात. त्यामुळे घरामध्ये कोण बसते आणि लोकांचे प्रश्न कोण सोडवते, हे महाराष्ट्राला माहिती असल्याचे सांगून बन म्हणाले, टपोरी कोण आहे, खंडणीखोर कोण आहे, सुपारी घेण्याचे, दलाली करण्याचे काम कोण करतेय, हे महाराष्ट्राला माहिती आहे. अटलजी, अडवाणी यांनी हिंदुत्वासाठी तुमच्यासोबत युती केली होती. भाजपाने 25 वर्ष हिंदुत्वासाठी तुमच्यासोबत युती केली होती. आमचा हिंदुत्वाचा धागा होता म्हणून ही युती होती. परंतु आज उबाठा गटाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे? जोपर्यंत तुम्ही हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारत नाहीत तोपर्यंत उबाठा गटाशी युती करण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्हाला आता हिंदू प्रिय नाहीत तर जनाब प्रिय झाले आहेत. जोपर्यंत तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मान्य करणार नाही तोपर्यंत तुम्हाला बुंदी मिळणार नाही तर तुम्हाला खडेच खावे लागतील, असेही बन यांनी सुनावले.
संजय राऊतांनी स्वप्ना पाटकरांविषयी कसली भाषा वापरली होती? आता महिलांविषयी योग्य भाषा वापरली पाहिजे, असे सांगणाऱ्या संजय राऊतांनी स्वप्ना पाटकरांबद्दल काय शब्द वापरले, कोणत्या शिव्या दिल्या, हे महाराष्ट्राने ऐकले आहे, पाहिली आहे. रोज सकाळी संजय राऊत माध्यमांसमोर येऊन शिवीगाळ करतात, नको नको ते शब्द वापरतात. ही भाषा योग्य आहे का? संजय राऊत, तुमच्या भाषेला महाराष्ट्र वैतागलेला आहे, असे बन यांनी फटकारले.





