spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सर्वार्थ समाधानी

…शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असे मार्गदर्शक तत्त्व एकेकाळी विशेषत: परराष्ट्र संबंधांबाबत सांगितले जात असे. सद्या:स्थितीत सर्व संबंध हेच मुळात फक्त व्यावहारिक झालेले असताना मित्र-शत्रू वगैरे चर्चा व्यर्थ…

भारत दौऱ्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या कोडकौतुकात आपण कोणतीही कसूर ठेवली नाही, हे उत्तम झाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे माथेफिरू प्रेमवीराप्रमाणे वागत असताना त्यांना आपल्याकडून ‘तू नही और सही’ असा संदेश दिला जाणे गरजेचे होते. तो पुतिन यांच्या भारत दौऱ्यात भरभरून देता आला. त्याची गरज ट्रम्प यांनीच निर्माण केली. ट्रम्प यांच्या हास्यास्पद धोरण- असातत्याने अमेरिका महान होईल, न होईल. पण त्यांच्या अशा वागण्याने अमेरिकेविरोधातील देशांचे संबंध अधिक दृढ होऊ लागतील; हे निश्चित. पुतिन यांच्या या दौऱ्यात त्याची प्रचीती आली. वास्तविक ट्रम्प यांच्या पहिल्या अध्यक्षपदाच्या काळात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध गोड मधुचंद्री होते. तेव्हा त्यामुळे पहिल्यांदाच आपण रशियापासून दूर जात असल्याचे चित्र निर्माण झाले. ते काही प्रमाणात योग्यही होते. कारण पुतिन यांचा रशिया हा सोविएत रशिया नाही. लष्करी उत्पादनांचा दर्जा खालावता आहे आणि काही वेगळी औद्याोगिक प्रगती या रशियास करता आलेली नाही. त्यात तसेही जग एककेंद्री होत होते. हे एकमेव केंद्र म्हणजे अमेरिका. पण स्वत:च्या देशाचे मोठेपण ट्रम्प यांच्यासारख्या खुजा व्यक्तीस खुपू लागले आणि त्यांनी जगातील अनेकांस अमेरिकेविरोधात उभे राहण्याची संधी दिली. ती आपण साधली. कारण आपणासाठीही पर्याय नव्हता. चीनने टोकले, अमेरिकेने टाकले अशा वेळी रशियास टिकवणे शहाणपणाचे होते. तो शहाणपणा आपण दाखवला. म्हणून या भेटीचे स्वागत.

युक्रेनवर युद्ध लादल्यानंतर पुतिन यांचा हा पहिला भारत दौरा. या युद्धास काही महिन्यांत चार वर्षे होतील. ते युद्ध थांबावे म्हणून अमेरिकेसह सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. पण पुतिन काही त्यांच्या हाती लागू देत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक निर्बंध लादले गेले. त्याचा फायदा आपल्याला स्वस्त तेलाच्या रूपाने झाला. पण अमेरिकेने आपल्यावर ५० टक्के निर्बंधांची गदा चालवल्यानंतर त्यावर आपणास पाणी सोडावे लागेल, हे स्पष्ट झाले. त्यामुळे आपल्या कंपन्यांस रशियन तेल खरेदीचे प्रमाण कमी करत आणावे लागले. यातून एक तिढा निर्माण झाला. अमेरिका ही या तिढ्यातील समान बाजू. एका बाजूने आपले अमेरिकेशी करार कुंथणे सुरू असताना रशियाचीही अडचण वाढत गेली. या तिढ्यास एक चौथा; पण अदृश्य कोन आहे. तो आहे चीन. अमेरिकेने डोळे वटारल्यामुळे आणि युरोप हा युक्रेनच्या मागे उभा राहिल्यामुळे पुतिन यांनी वेगळे संधान बांधले. ते म्हणजे चीन. त्या देशाचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि पुतिन यांच्यात गेल्या काही महिन्यातील सौहार्दाचे संबंध दिसतात ते यामुळे. म्हणजे एकाच वेळी भारत, रशिया आणि चीन या तीनही देशांचा एकच समान दु:खबिंदू तयार झाला. अमेरिका. अशा वेळी हे अमेरिकादु:ख कमी करण्यासाठी पुतिन हे चीन आणि क्षी जिनपिंग यांच्या अधिक जवळ जात राहिले तर आपल्यासाठी ती दुहेरी डोकेदुखी ठरली असती. म्हणजे आपण इतके काही करूनही ट्रम्प आपणास भीक घालण्यास तयार नाहीत, क्षी जिनपिंग आणि चीन यांच्यावर विश्वास टाकण्यात अर्थ नाही आणि असे असताना पुतिनही आपल्यापासून दूर गेले तर सगळेच आंतरराष्ट्रीय मुसळ केरात म्हणायचे. ते टाळणे आणि रशिया-चीन संबंध अधिक सुमधुर होण्यापासून थांबवणे ही आपली गरज होती. पुतिन यांच्या भारत दौऱ्यासही पार्श्वभूमी आहे. ती लक्षात घेतल्याखेरीज पुतिन यांचे आपण इतके कोडकौतुक का केले, हे समजून घेता येणार नाही. तेव्हा आपण पुन्हा एकदा पं. नेहरू यांनी घालून दिलेल्या ‘गड्या आपला रशिया बरा…’ या मार्गावर आलो.

पं. नेहरूंनी घालून दिलेला तो मार्ग अधिक प्रशस्त करण्याच्या आणाभाका पुतिन यांच्या दौऱ्यात घेतल्या गेल्या. त्याचाच एक भाग म्हणून २०३० पर्यंत उभय देशांतील व्यापार कित्येक पट वाढवण्याचा निर्धार उभयतांनी केला. देश कोणताही असो. व्यापारवृद्धी नेहमीच स्वागतार्ह. कारण अर्थव्यवस्थेच्या गतीसारखी उत्तम दुसरी कोणती गती नाही. त्यामुळे ती वाढत असेल तर उत्तम. तथापि यातील तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. विशेषत: आपणास हव्या असलेल्या ‘एस-४००’ या विशेष हवाई सुरक्षा यंत्रणेबाबत काय निर्णय झाला हे समजणे आवश्यक. कुख्यात पहेलगामवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान चकमकीत निर्णायक भूमिका या ‘एस-४००’ यंत्रणेने बजावलेली होती. त्यामुळे आपणास ही यंत्रणा अधिक मोठ्या प्रमाणावर हवी आहे. तसेच ‘राफेल’च्या जोडीला आपण रशियाची ‘एसयू-५७’ ही लढाऊ विमानेही खरेदी करू इच्छितो. पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कॉव्ह यांनी भारताच्या या खरेदी प्रयत्नांसंदर्भात दौऱ्यापूर्वी भाष्य केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्या चर्चेत हे विषय नक्की येतील असे त्यांचे म्हणणे. त्याचे पुढे काय झाले, याचा तपशील तूर्त उपलब्ध नाही. लष्करी साहित्य उत्पादनामध्ये ‘आत्मनिर्भर’ होण्याचा आपला स्तुत्य प्रयत्न असला तरी सध्या तरी आपणास अन्य अनेकांवर अवलंबून राहावे लागणार हे वास्तव. ते सर्व जाणतात. त्याचमुळे अमेरिका आपल्या गळ्यात ‘एफ-३५’ विमाने मारते, रशियाची ‘एस-४००’ यंत्रणा आपल्यासाठी निर्णायक ठरते आणि पाकिस्तानबरोबरील युद्धात फ्रान्सच्या ‘राफेल’चे काय झाले याचीच बातमी होते. या वास्तवामुळे दर्जा दुय्यम असला तरी आपणास रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी करावी लागणार. एकेकाळी आपली लष्करी उत्पादनांची जवळपास तीन-चतुर्थांश गरज रशियन उत्पादने भागवत असत. मध्यंतरी हे प्रमाण एकतृतीयांशावर आले. कारण फ्रान्स, अमेरिका आणि इस्रायल यांच्याकडून आपण मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. तथापि बदलत्या जागतिक परिस्थितीत आपणास पुन्हा एकदा रशियाकडे जावे लागेल, असे दिसते. ती आपली गरज आहेच, पण रशियाची गरज भागवत राहणे ही आपली अधिक मोठी गरज बनलेली आहे. याचे श्रेय अर्थातच ट्रम्प यांचे. आणि दुसरे असे की खुद्द अमेरिकाच जर पुतिन यांच्याशी व्यापार चर्चा करत असेल तर अमेरिकेच्या भीतीपोटी आपण आपल्या व्यापारी हितसंबंधांस मुरड घालण्याची काहीच गरज नव्हती. आज ना उद्या आपणास अमेरिकेशी व्यापार कराराच्या मुद्द्यावर भिडायचे आहेच. तसेच युक्रेनशी युद्धबंदी करण्याच्या मुद्द्यावर रशियासही अमेरिका आणि युरोप यांच्याशी दोन हात करायचे आहेत. तेव्हा ते होईपर्यंत अन्य देश आणि देशसमूह आपापले व्यापार संबंध सांभाळत असताना आपण त्याकडे दुर्लक्ष करणे अगदीच अयोग्य. ते आपण केले नाही.

शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असे मार्गदर्शक तत्त्व एकेकाळी विशेषत: परराष्ट्र संबंधांबाबत सांगितले जात असे. सद्या:स्थितीत सर्व संबंध हेच मुळात फक्त व्यावहारिक (ट्रान्झॅक्शनल) झालेले असताना मित्र-शत्रू वगैरे चर्चा व्यर्थ. त्याच व्यावहारिक दृष्टिकोनातून पुतिन यांची भारतभेट महत्त्वाची होती. आणि आवश्यकही. या सर्व गरजा या दौऱ्यात पूर्ण झाल्या. बाकी त्यांच्या दौऱ्याचा मुहूर्त साधून रशियाच्या ‘आरटी’ वृत्तवाहिनीची सेवा पुन्हा आपल्याकडे सुरू झाली. त्यामुळे आपल्याकडील ‘प्रोपगंडा’ वाहिन्यांत आणि प्रोपगंडोत्सुक पत्रकारांच्या व्यवसायसंधीत आणखी एकीची भर. पुतिन यांच्या त्या गरजेची पूर्तताही हा दौरा करतो. सर्वांच्याच गरजा यात पूर्ण होत असल्यामुळे या दौऱ्याचे फलित सर्वार्थाने समाधानकारक म्हणावे लागेल.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.