spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तृतीयपंथीयांच्या स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना ; २५ हजार ते २ लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य

मुंबई :- तृतीयपंथीय व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वयंरोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तृतीयपंथीयांच्या स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली असून या योजनेद्वारे २५ हजार रुपयांपासून ते २ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या योजनेचा उद्देश तृतीयपंथीयांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे. कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षणाद्वारे शाश्वत रोजगार निर्माण करणे. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकासास चालना देणे. लघुउद्योग व सूक्ष्म व्यवसाय सुरू करण्यासाठी बीज भांडवल उपलब्ध करून देणे.

योजनेअंतर्गत तीन प्रकारच्या कर्ज योजनांचा समावेश करण्यात आला आहे. लघु कर्ज योजनेत २५ हजार रुपयांपर्यंत, मध्यम कर्ज योजनेत ५० हजार रुपयांपर्यंत तर दीर्घ कर्ज योजनेत २ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. प्रत्येक योजनेत लाभार्थ्याचा हिस्सा ५ टक्के, शासन अनुदान ४५ टक्के आणि बँक कर्ज ५० टक्के या प्रमाणात निधीची रचना करण्यात आली आहे. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना ३ टक्के व्याज सवलतीचाही विशेष लाभ मिळणार आहे.

अर्जदाराने पुढील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्याचा किमान १० वर्ष रहिवासी असावा. सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेले तृतीयपंथीय ओळखपत्र असावे. वय १८ ते ५० वर्षे असावे. व्यवसाय करण्यास सक्षम असावा. यापूर्वी अन्य बीज भांडवल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. व्यवसायाचे कौशल्य असल्यास त्याचा उल्लेख करणे आवश्यक आहे. या योजनेसाठी जामीनदार किंवा तारणाची आवश्यकता नाही.

या योजनेद्वारे भाजी स्टॉल, चहा व स्नॅक्स सेंटर, झेरॉक्स व लेमिनेशन सेंटर, फ्रुट स्टॉल, पिठाची गिरणी, कापडी पिशव्या निर्मिती, स्टेशनरी दुकान, मिनी मालवाहतूक टेम्पो, जनरल स्टोअर्स, आईस्क्रीम फॅक्टरी, ज्यूस सेंटर, बेकरी, बांगडी दुकान, बटाटा वेफर्स निर्मिती, ब्युटी पार्लर, सलून, चिकन व मासे विक्री केंद्र, मोबाईल शॉपी, मसाले निर्मिती, लॉन्ड्री व्यवसाय तसेच प्लंबर, इलेक्ट्रिशियन, एसी, मोबाईल व घरगुती उपकरणे दुरुस्ती यांसारख्या विविध व्यवसायांसाठी कर्ज उपलब्ध होणार आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे महाराष्ट्रातील १० वर्ष वास्तव्यासंदर्भातील अधिवास प्रमाणपत्र, तृतीयपंथीय ओळखपत्र, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, रेशन कार्ड, लाईट बिल इत्यादी, व्यवसायाच्या जागेचा पुरावा, यंत्रसामग्री किंवा साहित्याचे कोटेशन भाडेकरार (लागू असल्यास) जागामालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक आहेत. इच्छुक तृतीयपंथीयांनी शासनाने विहित केलेल्या नमुन्यात दिलेल्या https://tinyurl.com/22wpc5j2 संबंधित लिंकवरून अर्ज डाउनलोड करून आवश्यक कागदपत्रांसह भरलेला अर्ज जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयात सादर करावा, असे मुंबई उपनगरचे सहाय्यक आयुक्त यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Popular Articles