spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

समाजप्रबोधनाच्या कार्याची दखल,शीतल भेंडारकर यांचा विधानसभा स्तरीय महा समाधान शिबिरात गौरव

– राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा गावागावांत प्रचार; अप्पर जिल्हाधिकारी घोरपडे यांच्या हस्ते सन्मान

पंकज परशुरामकर, इनसाइड न्युज टुडे प्रतिनिधी

नवेगाव बांध :- समाजप्रबोधनाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी करणाऱ्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सावरटोला येथील युवा प्रबोधनकार शीतल शंकर भेंडारकर यांच्या उल्लेखनीय कार्याचा विधानसभा स्तरीय महा समाधान शिबिरात गौरव करण्यात आला. त्यांच्या प्रभावी कीर्तनशैलीतून समाजात विवेक, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव जागृत करण्याच्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

लहान वयापासूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वारसा जपत शीतल भेंडारकर या गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून सातत्याने समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहेत. आपल्या ओजस्वी, अभ्यासपूर्ण आणि प्रभावी कीर्तनातून त्या सामाजिक, शैक्षणिक, नैतिक तसेच सांस्कृतिक विषयांवर जनजागृती करतात. त्यांच्या प्रबोधनामुळे युवक, महिला आणि ग्रामीण नागरिकांमध्ये सामाजिक जबाबदारी, राष्ट्रीय एकात्मता आणि मानवतेच्या मूल्यांविषयी सकारात्मक विचार रुजत आहेत.

कीर्तनाच्या माध्यमातून त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, संत तुकाराम महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समतावादी, पुरोगामी आणि समाजहितवादी विचारांचा गावागावांत प्रभावी प्रचार-प्रसार करीत आहेत. त्यांच्या प्रबोधनातून अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, व्यसनमुक्ती, शिक्षणाचे महत्त्व, सामाजिक ऐक्य, स्त्री-पुरुष समानता आणि मानवतेची मूल्ये याबाबत व्यापक जनजागृती होत आहे.

अर्जुनी सडक येथे आयोजित विधानसभा स्तरीय महा समाधान शिबिरात गोंदिया जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी श्री. घोरपडे यांच्या हस्ते तसेच अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत शीतल शंकर भेंडारकर यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या समाजहिताच्या कार्याचे मुक्तकंठाने कौतुक करत भविष्यातही अशाच प्रभावी समाजप्रबोधन कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

शीतल भेंडारकर यांच्या या सन्मानामुळे सावरटोला परिसरासह संपूर्ण अर्जुनी मोरगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील समाजप्रबोधन कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

समाजप्रबोधनाची प्रेरणादायी वाटचाल

“कीर्तन हे केवळ अध्यात्माचे नव्हे, तर समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. संतांच्या विचारातून समता, स्वच्छता, शिक्षण, व्यसनमुक्ती आणि मानवतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य  शीतल भेंडारकर सातत्याने करीत आहेत. त्यांच्या कार्याला मिळालेला हा सन्मान संपूर्ण गोंदिया जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.”

Popular Articles