– मागील सहा वर्षांतील एससी, एसटी, ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचीही सर्वंकष चौकशी करण्याची ॲड. धर्मपाल मेश्राम यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नागपूर / मुंबई :- आयआयटी मुंबई येथे द्वितीय वर्षात शिक्षण घेणारा विद्यार्थी वाकोडे याच्या आत्महत्येच्या घटनेची सर्वंकष आणि निष्पक्ष चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश चे माजी उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या प्रकरणात केवळ संस्थेची बाजू न ऐकता संबंधित विद्यार्थी, त्याचे मित्र, सहाध्यायी आणि प्रत्यक्षदर्शी यांच्या जबाबांचीही सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
ॲड. मेश्राम यांनी म्हटले की, विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या घटनेमागील नेमकी कारणे शोधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रकरणात आयआयटी प्रशासनाची बाजू समोर आली असली, तरी संबंधित विद्यार्थी आणि त्याच्या मित्रांची किंवा घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तींची बाजू अद्याप पुरेशा प्रमाणात समोर आलेली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.
कॅन्टीन, मेस आणि डिलिव्हरीवरील निर्बंधांचीही चौकशी करा
आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये मागील काळात विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये करण्यात आलेले बदल आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनावर झालेला परिणाम याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ॲड. मेश्राम यांनी केली.
त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांनुसार, कॅम्पसमधील एक कॅन्टीन बंद करण्यात आली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांपर्यंत येणाऱ्या बाह्य खाद्यपदार्थांच्या डिलिव्हरीवर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना झोमॅटो, स्विगी किंवा तत्सम सेवांद्वारे मागविलेले खाद्यपदार्थ घेण्यासाठी कॅम्पसच्या गेटपर्यंत सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंतर पार करावे लागत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.
याशिवाय, एफडीएच्या कारवाईच्या भीतीमुळे किंवा संबंधित नियमांच्या अंमलबजावणीच्या कारणास्तव दिवसरात्र सुरू असणारी मेस अथवा कॅन्टीन बंद करण्यात आली असल्यास, त्याची वस्तुनिष्ठ चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. विद्यार्थ्यांवर लादण्यात आलेले विविध निर्बंध, त्यामागील प्रशासनिक कारणे आणि त्यांचा विद्यार्थ्यांच्या मानसिक व सामाजिक जीवनावर होणारा परिणाम यांचा अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
मागील सहा वर्षांतील विद्यार्थ्यांच्या पासआउट प्रमाणाची तपासणी करा
ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीमध्ये आयआयटी मुंबईतील मागील सहा शैक्षणिक वर्षांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा तपशीलवार आढावा घेण्याची मागणी केली आहे.
सन २०१९-२० ते २०२४-२५ या शैक्षणिक कालावधीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी निर्धारित कालावधीत पदवीधर झाले, किती विद्यार्थी शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत आणि कोणत्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे पासआउट प्रमाण किती आहे, याची आकडेवारी संकलित करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले.
विशेषतः अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्गीय (OBC) आणि खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची स्वतंत्र आकडेवारी तपासण्यात यावी. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी, शैक्षणिक अडचणी आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या संस्थात्मक मदतीचा सर्वंकष अभ्यास करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जबाबदारी निश्चित करा
आयआयटीसारख्या देशातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षित, समावेशक आणि तणावमुक्त वातावरण मिळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारी, मानसिक ताण, संस्थात्मक निर्बंध आणि प्रशासनाशी संबंधित प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.
वाकोडे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या प्रकरणात सत्य परिस्थिती समोर आणण्यासाठी एसआयटीची स्थापना करावी. चौकशीमध्ये विद्यार्थी, त्यांचे पालक, मित्र, प्राध्यापक, प्रशासन आणि संबंधित सर्व व्यक्तींच्या जबाबांचा समावेश करण्यात यावा. तसेच मागील सहा वर्षांतील विविध सामाजिक प्रवर्गांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची आकडेवारी तपासून आवश्यक त्या सुधारणा करण्यात याव्यात, अशी मागणी ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे.
– ॲड. धर्मपाल मेश्राम
माजी उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश





