Home Latest News चिमुकल्या हातांनी दिला श्रीगणेशांच्या मूर्तीला आकार मनपाच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळेत...

चिमुकल्या हातांनी दिला श्रीगणेशांच्या मूर्तीला आकार मनपाच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळेत विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव

0
53

 

नागपूर, ता. २१ : प्रसिद्ध गीतकार गदिमांच्या फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार…. या अजरामर गीताची प्रत्यक्ष अनुभूती देत महानगरपालिकेच्या ६०० वर विद्यार्थ्यांनी आज शाडूच्या मातीपासून श्रीगणेशांची मूर्ती तयार करून पर्यावरणपूरक गणेश मूर्तीच्या अभियानाला नवा आयाम दिला. आमचा बाप्पा, इकोफ्रेंडली या बालकांच्या घोषणांनी समाजाला सर्जनशीलतेचा नवा संदेश दिला.

नागपूर महानगरपालिकेतर्फे गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक श्रीगणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित केली जाते. ही परंपरा यावर्षीही कायम ठेवली. पर्यावरणपूरक श्रीगणेशाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करा, या उक्तीला कृतीची जोड देण्याचा हा उपक्रम आहे. महानगरपालिका आयुक्त  तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या संकल्पनेतून व अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत व  वैष्णवी बी. यांच्या मार्गदर्शनात ही कार्यशाळा आज (ता. २१) कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडली.

या कार्यशाळेचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त ती वसुमना पंत यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर उपायुक्त . राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, उपशिक्षणाधिकारी  संजय दिघोरे, महानगरपालिकेच्या ब्रँड अॅम्बेसॅडर आंचल वर्मा,  किरण मुंदडा,  उमेश चित्रीव,  धनश्री. लेकुरवाळे,  रेषल भाटी उपस्थित होते.

पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची तयार करण्याच्या या कार्यशाळेत महानगरपालिकेच्या १८ शाळांचे ६०० वर विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभाग नोंदविला होता. महानगरपालिकेच्या विविध शाळांमधून आलेल्या या ५ ते १० व्या वर्गातील विद्यार्थ्यांचे चार विद्यार्थी मिळून एक गट तयार करण्यात आला. या गटाला मातीचा गोळे देण्यात आले. विद्यार्थ्यांनी तल्लीन होऊन या मातीच्या गोळ्यापासून श्रीगणेशांची मूर्ती साकारली. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर अवर्णनीय आनंद ओसंडून वाहत होता. श्रीगणेशाची मूर्ती कशी साकार तयार करायची. याबद्दल  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी श्रीगणेशांची मूर्ती साकार केल्या. काही वेळातच विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांना वाव देत श्रीगणेशांची मूर्ती साकार केली. या सर्व मूर्ती सभागृहात एका ठिकाणी रांगेत ठेवण्यात आल्या. या सर्व मूर्तींची पाहणी अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत व अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांनी केली. कार्यक्रमाचे संचालन महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी  मनीष सोनी यांनी केले.

प्रशिक्षकांचा सत्कार

महानगरपालिकेच्या या विद्यार्थ्यांना मातीपासून श्रीगणेशांची मूर्ती तयार करण्यासाठी महानगरपालिकेने तीन विशेष प्रशिक्षकांची पाचारण केले होते. यात  शैलेश बोदेले,  नीलम प्रजापती व  मोनल कोहाड यांचा समावेश होता. या सर्वांचा अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

पर्यावरणपूरक चळवळीला नवी दिशा – वसुमना पंत

नागपूर महानगरपालिकेने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा आयोजित करण्याचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून यामुळे लहान मुलांवर पर्यावरण पूरक श्रीगणेश मूर्ती तयार करण्याचा संस्कार होणार आहे. मुलांवर लहानपणापासून या प्रकारे संस्कार करण्याचा हा उपक्रमाला अधिकाधिक गती देण्याची  आवश्यकता असल्याचे अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन – वैष्णवी बी.

प्रदूषणाचा धोका वाढत असताना इको-फ्रेंडली श्रीगणेशांची मूर्तीबद्दल मुलांना मार्गदर्शन करण्याचा उपक्रम खूपच प्रेरणादायी असल्याची भावना अतिरिक्त आयुक्त  वैष्णवी बी. यांनी व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना अशा उपक्रमातून प्रोत्साहन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

उर्दू शाळांच्या विद्यार्थींनीनी साकारला श्री गणेश

यात उर्दू माध्यमांच्या दोन शाळांच्या विद्यार्थीनींचा सुद्धा समावेश आहे. या विद्यार्थींनीनी श्रीगणेशांची अत्यंत सुबक व सुंदर मूर्तीची निर्मिती केली. या विद्यार्थिनींनी सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा या गायिलेल्या गीताला उपस्थितांनी टाळ्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला. एमएचए उर्दू माध्यमिक शाळा व ताजाबाद उर्दू माध्यमिक शाळांच्या विद्यार्थीनी श्रीगणेशांची मूर्ती तयार करण्याच्या या कार्यशाळेत सहभाग नोंदविला.

  दोन्ही अतिरिक्त आयुक्तांनी तयार केली मूर्ती

महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत व  वैष्णवी बी. यांनी विद्यार्थ्यांसोबत मातीची मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेत प्रत्यक्ष भाग घेतला व श्रीगणेशांची मूर्ती तयार केली. हा नवा अनुभव असल्याचे  वसुमना पंत व  वैष्णवी बी. यांनी यावेळी सांगितले.