spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पावसाळ्यापूर्वी शहरातील समस्या सोडवा; काँग्रेस आक्रमक, नगर परिषद प्रशासनाला दिले निवेदन

हंसराज भंडारा :- भंडारा शहरातील रखडलेली विकासकामे, पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई, रस्त्यांची दुरवस्था आणि नागरिकांच्या विविध प्रलंबित समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नगर परिषद प्रशासनाला गुरुवारी निवेदन देण्यात आले. जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर यांच्या नेतृत्वाखाली आणि शहर अध्यक्ष धनराज साठवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन उपमुख्याधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. पावसाळा तोंडावर असल्याने शहरात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य संकटांबाबत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

शहरातील अनेक भागांत सध्या विकासकामे अपूर्ण असून ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघातांचा धोका वाढू शकतो, तसेच नाल्यांची सफाई न झाल्यास सांडपाणी रस्त्यावर येऊन डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांची साथ पसरण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या प्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर म्हणाले की, “नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षा हा महत्त्वाचा विषय आहे. प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी ठोस पावले उचलून पाणी साचणाऱ्या भागांत विशेष लक्ष द्यावे. जनतेच्या समस्या केवळ फाईलमधील कागद नसून त्या त्यांच्या आयुष्याशी निगडित आहेत.”

यावेळी केवळ नागरी सुविधाच नव्हे, तर प्रशासकीय कामकाजातील अडचणींवरही चर्चा करण्यात आली. शहरातील अनेक नागरिकांना जुन्या जन्म नोंदी मिळवताना त्रास सहन करावा लागत आहे. रेकॉर्ड जीर्ण झाल्याचे कारण पुढे करून नागरिकांना वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात, हा त्रास त्वरित थांबवून मार्ग काढण्याची मागणी करण्यात आली. यासोबतच औषध फवारणी आणि स्वच्छता व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

या आंदोलनाप्रसंगी भंडारा शहर काँग्रेस अध्यक्ष धनराज साठवणे, किशोर राऊत, माजी नगर परिषद सदस्य पृथ्वी तांडेकर, नगर परिषद सदस्य कमल साठवणे, नरेंद्र साकुरे, नवाब शेख, सोनू कोटवानी, अयुब पटेल, वैभव मेंढे, फारुख शेख, कोमल कळंबे, प्रणय मेश्राम, जनार्दन निंबार्ते, यश चवडे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Popular Articles