spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तुमसर पोलिसांची मोठी कारवाई; घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

– १००% गुन्हे उघड करण्यात तुमसर पोलिसांना यश; पाचही घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा

हंसराज भंडारा तुमसर :- तुमसर शहरात घरफोडी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यात तुमसर पोलिसांना मोठे यश आले आहे. फेब्रुवारी महिन्यात श्रीराम नगर भागात झालेल्या एका घरफोडीचा तपास लावत पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे, सन २०२६ मध्ये तुमसर पोलीस ठाण्यात दाखल झालेले सर्व पाचही घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी आपली विशेष छाप पाडली आहे.

फिर्यादी चंद्रशेखर श्रीराम सार्वे (वय ४२, रा. खडकी, ता. मोहाडी, सध्या रा. श्रीराम नगर, तुमसर) हे बांधकाम ठेकेदार आहेत. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५:३० च्या दरम्यान ते घराला कुलूप लावून कामावर गेले होते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि बेडरूममधील कपाटातून ४० हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र आणि ३० हजार रुपये रोख, असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. २८३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(३), ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणेदार पो.नि. सुभाष बारसे यांनी तपासासाठी स्वतंत्र पथके तयार केली. गोपनीय माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास पथकाने मालवीय वार्ड, तुमसर येथून संशयित आरोपी प्रदिप प्रेमलाल गौरे (वय ४७) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून ४० हजार रुपये किमतीची ४.७८० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड जप्त केली आहे.

तुमसर पोलिसांनी यावर्षी घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये उल्लेखनिय कामगिरी केली आहे. सन २०२६ मध्ये आतापर्यंत घरफोडीचे एकूण ५ गुन्हे दाखल झाले होते. पोलीस प्रशासनाने अहोरात्र मेहनत घेऊन हे पाचही गुन्हे (१००%) उघडकीस आणले आहेत. या पाचही प्रकरणांमध्ये एकूण २,९३,२००/- रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता, ज्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

सदर कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक (तुमसर उपविभाग) मयंक माधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सयाम, पोलीस हवालदार शरद रामटेके, पोलीस शिपाई बळदे, राजकुमार गिरीपुंजे, नितीन झंझाड, विजय दमाहे आणि अजय बावने यांचा समावेश होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सयाम करीत आहेत.

तुमसर पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून सर्वत्र पोलिसांचे कौतुक होत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.