यवतमाळ :- अवयवदान हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल. अनेकदा तुम्ही अवयवदानाचे आव्हाहन करणाऱ्या जाहीराती सुद्धा पाहील्या असतील की मी मृत्यु नंतर माझे सर्व अवयव दान करणार. त्यावेळी तुमच्याही मनात कित्येक प्रश्न आले असतील की, अवयवदान म्हणजे नेमके काय ? कुणीही व्यक्ती अवयवदान करु शकते का? अवयवदानाची प्रक्रीया काय? मृत्युपश्चात वेगवेगळ्या धर्मात शरीराची विल्हेवाट वेगवेगळ्या प्रकारे लावली जाते. जरी शरीरातुन प्राण गेले असले तरी काही अवयव हे मृत्युनंतर काही काळासाठी सक्रीय असतात त्यांचा जर वेळेत वापर करुन ते अवयव दुसऱ्याच्या शरीरात बसवले तर त्या व्यक्तीला त्या अवयवांचा फायदा होवु शकतो. आज अवयवांची आवश्यकता असलेल्यांची प्रतिक्षा यादी वाढत चालली आहे. यात बदल घडवायचा असेल तर अवयवदानाबाबत जनसामान्यांच्या माणसिकतेत बदल होणे गरजेचे आहे. असे मत सामान्य रुग्णालयचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांनी व्यक्त केले.
देशामध्ये अवयवदाना बद्दल जागरुकता पसरवण्यासाठी, अवयवदानाशी संबंधित समज व गैरसमज दुर व्हावे आणि मृत्युनंतर अवयव व उतींचे दान करण्यासाठी नागरिकांत प्रेरणा व अवयवदानाचे मुल्य रुजावे या उद्देशाने दि. ३ ऑगस्ट हा दिवस भारतीय अवयवदान दिन म्हणुन साजरा करण्यात आला. अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असून ज्याद्वारे आपण मृत्युनंतर आपले अवयव दान करून अंतिम स्वरुपी ज्यांचे अवयव निकामी झाले आहेत. अशा अनेक रुग्णांचे प्राण वाचवू शकतो. ज्या रुग्णांचे अवयव कायम स्वरुपी निकामी झाले आहेत अशा अनेक रुग्णांसाठी अवयव दान हाच एक आशेचा किरण आहे.
आपण कोणत्या अवयवांचे दान करु शकतो ?
जिवंत व्यक्ती फक्त आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठीच अवयव दान करु शकतो. रुग्ण दात्यांचा जवळचा नातेवाईक म्हणजे मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ, बहिण अथवा पती किंवा पत्नी असावा लागतो. या व्यतिरिक्त कोणत्याही रुग्णासाठी अवयव दान करायचे असल्यास शासनाची परवानगी घ्यावी लागते. शासन रुग्ण व दाता यामध्ये काही आर्थिक देवाणघेवाण नसुन फक्त प्रेम व स्नेह या नात्यानेच अवयव दान होत आहे याची दक्षता घेऊनच जिवंत व्यक्ती अवयव दान करु शकतो यामुळे जिवंत व्यक्ती फक्त काही मर्यादित अवयवाचेच म्हणजे मुत्रपिंड अथवा यकृताचा काही भाग दान करु शकतो.
मृत व्यक्ती जिची हृदय क्रिया बंद पडली आहे, फक्त नेत्र व त्वचा या अवयवांचे दान करु शकतो. मृत व्यक्तीत हृदयक्रिया बंद पडल्यामुळे इतर अवयवांना रक्त पुरवठा थांबलेला असतो व हे अवयव प्रतिरोपणासाठी बाद ठरतात. परंतु मृत व्यक्ती जिची हृदयक्रिया चालु आहे म्हणजे ‘जिचा मस्तीष्कस्तंभ मृत्यु (ब्रेन डेड) झाला आहे अशी व्यक्ती मुत्रपिंड, फुप्फुसे, यकृत, स्वादुपिंड, हृदय, आतडी, नेत्र, त्वचा, हृदयाची झडप आणि कानाचे ड्रम यांचे देखिल दान करु शकते.
मस्तीष्कस्तंभ मृत्यु (ब्रेन डेड) म्हणजे काय ?
वैद्यकीय शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीची चेतना व श्वासोच्छवास कायमस्वरुपी बंद झाल्यास त्याला मृत घोषित करता येते. परंतु चेतना व श्वासोच्छवास या दोन्हीचे केंद्र आपल्या मेंदूतिल मस्तीष्कस्तंभ या भागात असते. अपघातात डोक्याला मार लागल्याने, मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने अथवा मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर मस्तीष्कस्तंभास कायमस्वरुपी ईजा झाल्यास त्या व्यक्तीचा मस्तीष्कस्तंभ मृत्यु होवु शकतो.
एखाद्या व्यक्तीचे अतिदक्षता विभागात उपकरणांच्या सहाय्याने हृदय कृत्रिमरित्या क्रियाशिल ठेवले असेल व काही ठराविक व प्रमाणीत चाचण्यांच्या आधारे जर तिचा मस्तीष्कस्तंभ मृत झाल्याचे निश्चित झाले तर त्या व्यक्तीस मृत घोषित करता येते. अशा व्यक्तीचे हृदय जास्तीत जास्त ३६ ते ७२ तासापर्यंत कृत्रिमरित्या क्रियाशिल ठेवता येते व याच कालावधीत प्रमुख अंतर्गत अवयवांचे दान होवु शकते. यासाठी जवळच्या नातेवाईकांची संमती आवश्यक असते. असे अवयवदान फक्त शासनाने प्रत्यारोपणासाठी मान्यता दिलेल्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मस्तीष्कस्तंभ मृत्यु झाल्यासच होवु शकते.
दान केलेल्या अवयवांचे वितरण कसे होते ?
गरजू रुग्णांचे वय, रक्तगट, त्याच्या आजाराची तिव्रता, ते किती दिवस अवयवांची प्रतिक्षा करीत आहे त्यांची वैद्यकीय गरज या सर्वांसाठी प्रत्येक रुग्णांस काही गुण दिले जातात. या सर्व गरजू रुग्णांची एक सामायिक प्रतिक्षा यादी केली जाते व सर्वाधिक गरजू रुग्णास अवयव दिला जातो. रुग्णांची आर्थिक स्थिती व जात, धर्म याचा प्रतिक्षा यादीतील त्यांचे स्थान ठरवितांना काही सबंध नसतो अवयवांचे वितरण हे महाराष्ट्र शासनाने घालुन दिलेल्या नियमानुसार पारदर्शक पणे होने
अवयवदान केल्याने मस्तिष्कस्तंभ मृत दात्याचे शरीरावर काही विट्टपता येते का ?
मस्तीष्कस्तंभ मृत (ब्रेन डेड) दात्यास ऑपरेशन थेअटर मध्ये नेऊन त्याचे अवयव काळजीपुर्वक काढले जातात व शरीरावर विट्टपता येत नाही. एखाद्या जिवंत व्यक्तीची शस्त्रक्रिया जितक्या काळजीपुर्वक केली जाते तितक्याच काळजीपुर्वक अवयव काढले जातात. व जखमा पुन्हा शिवल्या जाते. शरीरावर, पोटावर अथवा छातीवर शस्त्रक्रिया केल्याचे टाके मात्र राहतात.
अवयवदानासाठी कुठे संपर्क साधावा.
अवयवदान अणि ऑनलाईन प्रतिज्ञा संदर्भात अधिक माहीतीसाठी NOTTO च्या www.notto.abdm.gov.in या संकेतस्थळावरील वेब पोर्टलच्या माध्यमातुन ऑनलाईन प्रतिज्ञेद्वारे जास्तीत जास्त नोंदणी करावी सदर नोंदणी परिशिष्ट १ मध्ये संलग्न क्युआर कोड स्कॅन करुन वेब पोर्टलवर देखिल करता येईल. अधिक माहीतीसाठी NOTTO च्या कॉल सेंटरशी टोलफ्री हेल्पलाईप क्रमांक १८००-११-४७७० यावर संपर्क साधावा.





