spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विशेष लेख – डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा 2 लक्ष 97 हजार शेतकऱ्यांना लाभ

– नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा

महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहे. शेतकरी हिताचे निर्णय व कल्याणकारी योजनांतून याची प्रचिती येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने नुकतेच ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ जाहीर करून ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यासोबतच डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचाही लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. पीक कर्ज घेताना जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून नागपूर विभागातील 6 जिल्ह्यांमधील 2 लाख 97 हजार 366 शेतकरी सभासदांना 52 कोटी 96 लाख रुपयाच्या कर्जावरील व्याज माफ झाले आहे. व्याजाची रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याने आता ही योजना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.

पीक कर्जाची वसुली मुदतीपूर्वी होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहनात्मक अनुदान देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या अल्पमुदती पीककर्जाची संपुर्ण परतफेड प्रतीवर्षी ३० जून पूर्वी केल्यास शेतकऱ्यांना शासनाकडून व्याज सवलत अनुदान स्वरुपात देण्यात येत आहे. दि. ११ जून २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये रुपये तीन लाखापर्यंतच्या पीक कर्जासाठी ३ टक्के दराने व्याज सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. पीक कर्जाची परतफेड शेतक-यांनी विहित मुदतीत केल्यास त्यांना केंद्र शासनाच्या त्याचप्रमाणे प्रस्तुत योजनेचा लाभ मिळून रु. तीन लाखापर्यतचे पीक कर्ज बिन व्याजी उपलब्ध होत आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमुळे शेतकऱ्यांना बँक व्याज आकारते पण ते व्याज शासन भरते. शेतकऱ्यांनी फक्त मूळ रक्कम परत करायची आहे. शेतकऱ्यांना शेती उत्पादनासाठी प्रोत्साहन देणाऱ्या या योजनेचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना मिळावा यासाठी राज्य शासनाने वर्षासाठी 498 कोटी 75 लक्ष रुपयाची तरतूद केली आहे.

या योजनेअंतर्गत नागपूर विभागात मार्च अखेरपर्यंत 2 लक्ष 97 हजार 366 लाभार्थी शेतकऱ्यांना 52 कोटी 96 लाख 65 हजार रुपये वितरित करण्यात आले. ही रक्कम शासनाकडून लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा झालेली आहे. ही योजना म्हणजे शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यात न ठेवता त्यांना प्रोत्साहन देऊन आर्थिक स्वावलंबनाकडे नेणारी महत्त्वाची योजना ठरली आहे.

नागपूर विभागात या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विभागातील 2 कोटी 97 लाख 366 लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये नागपूर जिल्ह्यातील 7 हजार 319 शेतकऱ्यांना 2 कोटी 51 लाख रुपयाची व्याज सवलत मिळाली आहे. भंडारा जिल्ह्यातील 1 लाख 14 हजार 623 लाभार्थी शेतकऱ्यांना 15 कोटी 46 लाख रुपयांची व्याज सवलत मिळाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील 40 हजार 821 शेतकऱ्यांना 5 कोटी 35 लाख रुपये, चंद्रपूर जिल्ह्यातील 1 लाख 18 हजार 624 शेतकऱ्यांना 27 कोटी 70 लाख रुपयांची तर गडचिरोली जिल्ह्यातील 1 हजार 558 शेतकऱ्यांना 1 कोटी 90 लक्ष रुपये व्याज सवलत मिळाली आहे. विभागात ही योजना मागील चार वर्षापासून प्रभावीपणे राबविण्यात येत असल्यामुळेच दरवर्षी लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत आहे. यामध्ये 2022- 23 मध्ये 1 लाख46 हजार 866 शेतकऱ्यांना 19 कोटी 87 लक्ष रुपये, सन 23 -24 मध्ये 96 हजार 680 लाभार्थी शेतकऱ्यांना 15 कोटी 47 लाख रुपये तर 24 -25 या आर्थिक वर्षात 1 लाख 24 हजार 597 लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात 18 कोटी 79 लक्ष रुपये कर्जमाफी जमा करण्यात आली आहे.

व्याज सवलत योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी तीन लाख रुपयापर्यंत शेती कर्ज घेतलेले असणे तसेच हे कर्ज नियमितपणे भरत असणे आवश्यक आहे. जे शेतकरी या दोन्ही अटी पूर्ण करतात त्यांना त्यांच्या कर्जावरील व्याज परत मिळणार आहे. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ही योजना कर्ज खात्याशी आधार लिंक असलेल्या असलेल्या लाभार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेसाठी या योजनेचे लाभार्थी पात्र आहेत त्यामुळे कर्जदार शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचा एकत्र लाभ मिळणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.