spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विशेष लेख – शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जाणता राजा

जाणता राजा, रयतेचा राजा म्हणून जगभरात दरारा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, स्वभावातील सहिष्णुता, दूरदृष्टी, करारीपणा व धाडसी वृत्ती अशी अनेकविध गोष्टी आजही समाजाला प्रेरणा देतात. शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेत लोकमान्य टिळक स्वातंत्र्य संग्रामात सहाभागी झाले होते आणि त्यांनी शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्याची प्रथा सुरु केली.

छत्रपती शिवाजी महाराज हे असे महापुरुष होऊन गेले की, त्यांचे कार्य, पराक्रम आणि विचार यांची प्रेरणा अजूनही ताजी आहे. आजही आपण त्यांच्या काळासंदर्भात त्यांच्या स्वराज्य निर्मितीचा विचार करायला लागतो तेव्हा त्यांनी किती प्रतिकूल स्थितीत हे सतीचे वाण आपल्या हाती घेतले होते याचा अचंबा वाटतो.

शिवाजी महाराज ज्या प्रदेशात रहात होते तो प्रदेश आदिलशहाच्या अधिपत्याखाली होता. तेव्हा त्यांच्या विरोधात बंड करणे म्हणजे प्राणाशी गाठच असायची. डोळे फोडणे, मालमत्तेची राखरांगोळी करुन जबर दंड बसवणे, कुटुंबांसह जाळून हत्या करणे, तोफेच्या तोंडी देणे, कडेलोट करणे, हत्तीच्या पायाखाली चिरडून मारणे किंवा घोड्यांच्या पायांना बांधून फरपटत नेणे अशा अमानुष शिक्षा दिल्या जात असत. अशा शिक्षा भोगण्यापेक्षा त्यांच्या पायाशी शरण जाणे परवडेल अशी मानसिकता समाजात होती. पण शिवाजी महाराजांनी अशाही परिस्थितीत परकीयांची राजवट उलथून टाकून स्वत:चे राज्य निर्माण करण्याचा पण केला. हे त्यांचे महान कार्य आजही आपल्याला प्रेरणा देत असते.

शिवाजी महाराजांनी एकदा साहस करण्याचा निर्धार केल्यावर कितीही संकटे आली तरीही आपल्या ध्येयापासून विचलित न होण्याचा त्यांचा गुणही असामान्यच होता. राजे निश्चयापासून ढळले असते तर सारे सहकारीही बिथरले असते. म्हणून खंबीरपणे उभे राहून महाराजांनी केवळ अडचणींना तोंडच दिले असे नाही तर त्या अडचणींतून मोठ्या कुशलतेने मार्गही काढले. महाराजांनी आपल्या सवंगड्यात स्वराज्य स्थापनेचा ध्येयवाद इतका पक्का रुजवला होता की, त्या ध्येयवादाच्या मार्गातून त्यांचे सहकारी कधीही ढळले नाहीत. शिवाजी महाराजांचे काही आप्त त्यांच्या विरोधात होते. पण तरीसुद्धा ते डगमगले नाही. स्वराज्यापायी आपल्या संसाराची वाताहत कशाला करुन घ्यायची? असा विपरीत विचार शिवाजी महाराजांनी केला नाही. शिवाजी महाराजांचे आयुष्य संघर्षमय होते. तरी त्यावर पाय रोवून उभे राहत महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली.

शिवाजी महाराजांकडे अनेक जातीवंत घोडे होते. शिवाजी महाराज घोड्यांचा वापर निर्णायक प्रसंगी करत असत. शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमांमध्ये घोड्यांचा वापर नेमकेपणाने केला. शिवाजी महाराजांकडे मोती, विश्वास, तुरंगी, इंद्रायणी, गाजर, रणभीर, कृष्णा असे सात घोडे होते. कृष्णा या पांढऱ्या घोड्यावर शिवाजी महाराज राज्यभिषेकानंतर बसले होते. सुरतवर चढाई, आग्राहून सुटका अशा मोहिमांवर त्यांनी विजय मिळवला.

शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सुमारे ४०० गड आपल्या अधिपत्याखाली आणले होते. काही गड त्यांनी स्वत: बांधले, तर काही किल्ले लढाया करुन जिंकले. महाराजांचे गड-किल्ले म्हणजे स्थापत्यशास्त्र, व्यवस्थापन आणि गनिमी काव्याचे प्रतीकच होते.

आजच्या घडीला शेकडो फूट बोअर करुनही पाणी लागत नाही. परंतु महाराजांच्या ४०० वर्षानंतरही महाराष्ट्रातील कुठल्याही किल्ल्यावर गेलो, तर ४ हजार फूट उंचीवर भर उन्हाळ्यात आपल्याला किल्ल्यावरील टाक्यांमधून स्वच्छ पाणी आढळते. या गड-किल्ल्यांवर कोणतीही पाईपलाईन असल्याचे दिसत नाही.

शिवाजी महाराजांनी प्रत्येक किल्ल्यावर २ प्रकारचे हौद बांधले. एक खुले आणि दुसरे भूगर्भात किल्ल्यावरील पाण्याचे हौद वा टाक बांधकामात खडक फोडण्यासाठी दारुगोळा किंवा सुरुंग कधीच वापरले नाहीत. त्याऐवजी नैसर्गिक साधनांचा वापर करुन खडक फोडले. म्हणूनच टाक्यांचा आकार एकदम आयताकृती आहे. याच टाक्यांमधील पाणी संपूर्ण गडावर वापरले जायचे. ते पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी नैसर्गिक तंत्राचा वापर केला जायचा. पाण्याचे टाके ५० ते १५० फुट खडकापर्यंत खोल कोरलेले आहेत. वयाच्या १७ व्या वर्षी शिवरायांनी स्वत: डिझाइन करुन राजगड बांधल्याचे सांगितले जाते.

शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अष्टप्रधान मंडळाचे महत्त्व अनन्यसाधारण होते. जगाच्या इतिहासात हा एकमेव राजा आहे, ज्याच्या दरबारी कधी स्त्री किंवा नर्तकी नाचली नाही. छत्रपती शिवाजी महाराज अतिशय चारित्र्यसंपन्न होते. महाराजांनी स्वत:साठी मोठे महाल बांधले नाहीत. सत्तेचा वापर स्वत:च्या किंवा कुटुंबाच्या फायद्यासाठी केला नाही. शिवाजी महाराज नेहमी ‘रयतेचं स्वराज्य’ असाच शब्द वापरत.

महाराष्ट्राच्या किनार पट्टीवर 1671 मध्ये मीठ शेती केली जायची. परंतु इंग्रज, डच, पोर्तुगीज यांनी तेथील शेती मोडीत काढण्यासाठी गोवा प्रांतातून मीठ आणून त्याची स्वस्तात विक्री सुरु केली, हे लक्षात आल्यावर महाराजांनी आयात मिठावर कर लावला, त्यामुळे आयात मीठ महाग झाले व आपल्या शेतकऱ्यांच्या मिठाची मागणी वाढली. रयतेच्या विचारांचे निर्णय म्हणजे जाणता राजा.

शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले हाच केवळ त्यांचा मोठेपणा आहे असे नाही, तर त्यांनी शुन्यातून स्वराज्य निर्माण केले आणि अक्षरश: मुठभर सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी इतिहासदत्त कार्य केले. मध्ययुगामध्ये अनेक राजे, महाराजे आणि सुलतान होऊन गेले त्यांच्याशी तुलना केली असता शिवाजी महाराजांचे स्वराज्य विस्ताराने फारसे मोठे नव्हते. प्रजेला कसलाही त्रास होऊ नये, याबाबत शिवाजी महाराज कमालीचे दक्ष होते.

भूमीवर अधिपत्य गाजवणारे अनेक भूपती… या जगती जन्मले आणि मेले, परंतु करोडो ह्दयावर अधिपत्य गाजवणारे एकच शिवछत्रपती अवतरले …!! छत्रपती शिवाजी महाराज ..

गगन भेदी नजर ज्याची, पहाड सम विशाल काया !!

धगधगता सुर्य ही झुकतो, वंदितो तुला शिवराया !!!

– कविता फाले-बोरीकर


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.