spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडारा जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय योजनांच्या जनजागृती शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

हंसराज भंडारा :- जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा सर्वांगीण विकास आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील मच्छीमार व मत्स्यव्यवसायिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, भंडारा कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये विशेष जनजागृती व लाभार्थी नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांना मच्छीमार, मत्स्यव्यवसायिक, मत्स्य सहकारी संस्था तसेच मत्स्यपालनाशी संबंधित नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिरांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध मत्स्यव्यवसाय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. किसान क्रेडिट कार्ड (KCC) अंतर्गत ₹2 लाखांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या खेळत्या भांडवली कर्जावर केंद्र शासनाकडून 3 टक्के व राज्य शासनाकडून 4 टक्के व्याज परतावा, मत्स्यव्यवसाय प्रकल्पांसाठी वीजदरातील सवलत, केंद्र पुरस्कृत अपघात गट विमा योजनेअंतर्गत ₹5 लाखांचे विमा संरक्षण, NFDP नोंदणी, ई-श्रम कार्ड, मासेमारी साधनांसाठी अर्थसहाय्य तसेच मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत उपलब्ध अनुदान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी मत्स्यपालनातील विविध अडचणी व त्यावरील उपाय, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांची माहिती देण्यात आली. तसेच किसान क्रेडिट कार्ड (KCC) व अपघात गट विमा योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांकडून अर्जही स्वीकारण्यात आले.

जिल्ह्यातील मच्छीमार व मत्स्यव्यवसायिकांना शासनाच्या योजना गावपातळीवर उपलब्ध करून देणे, अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ पोहोचविणे, आर्थिक सक्षमीकरणास चालना देणे आणि शाश्वत मत्स्यव्यवसायाला प्रोत्साहन देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे विभागाने स्पष्ट केले.

भविष्यातही अशा प्रकारचे जनजागृती कार्यक्रम, प्रशिक्षण शिबिरे आणि लाभार्थी नोंदणी उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व पात्र मच्छीमार व मत्स्यव्यवसायिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन विकासाच्या प्रवाहात सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, भंडारा, डॉ. पल्लवी केशव पाखमोडे यांनी केले आहे.

Popular Articles