spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘मेरे महबूब ना जा’ हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर :- स्वरधारा परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मेरे महबूब ना जा’ या हिंदी चित्रपट गीतांच्या बहारदार कार्यक्रमाला नागपूरकर रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शनिवार, १३ जून रोजी, हिंदी मोर भवन येथील उत्कर्ष सभागृहात सादर झालेल्या या कार्यक्रमात सुवर्णकाळातील अनेक अजरामर हिंदी चित्रपट गीतांचा सुरेल खजिना उलगडला गेला. त्यामुळे उपस्थित रसिकांना स्वरानंदाची अविस्मरणीय अनुभूती मिळाली. कार्यक्रमाची संकल्पना, आयोजन, संयोजन तसेच गायनाची जबाबदारी चंद्रशेखर तासगांवकर यांनी सांभाळली. कार्यक्रमाची सुरुवात शालिनी शुक्ला यांच्या सरस्वती वंदनेने झाली. त्यानंतर तासगांवकर यांनी ‘तकदीर का फसाना जाकर किसे सुनाये’ हे गीत सादर करून मैफिलीचा सुरेल प्रारंभ केला.

यावेळी अशोक गांधी यांनी ‘ये मेरा दिवानापन है’, विजय रामटेके यांनी ‘गर तुम भुला ना दोगे’, रोहिणी पाटणकर यांनी ‘काली घटा छाये मोरा जिया’, शालिनी शुक्ला यांनी ‘दो लफ्जों की है प्रेम कहानी’, शेखर जोगवार यांनी ‘जीवन से भरी तेरी आँखे’, श्रीकांत पैठणकर यांनी ‘मुझे दर्दे दिल का पता ना था’, मानसी बढे यांनी ‘रोज रोज डाली’, तर चेतन एलकुंचवार यांनी ‘रुख से जरा नकाब उठा दो’ हे गीत सादर केले. कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते श्रद्धा डाऊ यांनी सुमन कल्याणपूर यांना अर्पण केलेली सुरेल आदरांजली. त्यांनी कार्यक्रमाचे शीर्षक गीत ‘मेरे महबूब ना जा’ सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर चंद्रशेखर तासगांवकर आणि रोहिणी पाटणकर यांनी ‘उडे जब जब जुल्फें तेरी’ हे लोकप्रिय युगलगीत सादर करत श्रोत्यांना ताल धरायला भाग पाडले. याशिवाय ‘जब मोहब्बत जवान होती है’, ‘ये रातें ये मौसम’, ‘मैं प्यार का राही हूँ’, ‘तेरी आँखों की चाहत में’, ‘जाइये आप कहाँ जायेंगे’, ‘सलोना सा सजन’, ‘सांझ ढले गगन तले’, ‘वक्त करता जो वफा’, ‘रुके रुके से कदम’, ‘जाने क्या ढूंढती रहती हैं’, ‘निगाहें मिलाने को जी चाहता है’, ‘दिवाना हुआ बादल’, ‘बार बार तोहे क्या समझाये’ आणि ‘दिल की नजर से’ यांसारखी अनेक गाजलेली एकल व युगल गीते सादर करण्यात आली. कार्यक्रमाचा समारोप चेतन एलकुंचवार आणि मानसी बढे यांनी सादर केलेल्या ‘ना जाने कहाँ तुम थे’ या मधुर गीताने झाला. अशोक गांधी यांच्या माहितीपूर्ण आणि रसाळ निवेदनाने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली. संजय कुलकर्णी यांनी तांत्रिक सहाय्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. पावसाचे सावट असूनही रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या अखेरपर्यंत श्रोत्यांची उपस्थिती कायम राहिल्याने स्वरधारा परिवाराच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त दाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Popular Articles