Home Latest News स्थायी समिती अन् आरोग्य विशेष समिती सभापतींनी केली भांडेवाडी परिसराची पाहणी

स्थायी समिती अन् आरोग्य विशेष समिती सभापतींनी केली भांडेवाडी परिसराची पाहणी

0
31

– सुसबिडी आणि भूमी ग्रीन प्रकल्पाची जाणून घेतली माहिती

नागपूर :- मनपाच्या स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे आणि वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती मनीषा अतकरे यांनी भांडेवाडी स्थित मनपाच्या एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाला भेट देत प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी वरिष्ठ नगरसेवक प्रदीप पोहणे, शारदा बराई यांच्यासह मनपाचे उपायुक्त राजेश भगत, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, मुख्य स्वच्छता अधिकारी गजेंद्र महल्ले प्रामुख्याने उपस्थित होते.

शहरात दररोज १३०० मेट्रिक टन कचरा निर्माण होत आहे. सध्या सुसबिडीच्या मध्यामातून २५०-३०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असून, भूमी ग्रीन प्रा.लि. कंपनीद्वारे ५०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. आता नवीन कचऱ्यावर दररोज प्रक्रिया केल्यामुळे या नव्याने कचऱ्याचे ढिगारा निर्माण होणार नाही, आणि जुन्या कचऱ्यावर सुद्धा प्रक्रिया सुरू आहे. परिणामी भांडेवाडी परिसरात दिसणारे कचऱ्याचे ढिगारे कमी होऊन जागा मोकळी होण्याची शक्यता आहे. याप्रसंगी स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे आणि वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती मनीषा अतकरे यांनी संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करीत प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्याची माहिती जाणून घेतली. यावेळी भूमी ग्रीन प्रा.लि. कंपनीचे विजय टिळेकर, पंकज पासनकर, श्रीकृष्ण दीक्षित यांनी प्रकल्पाची माहिती दिली. विशेष म्हणजे, पुणे येथील भूमी ग्रीन एनर्जी एन्व्हायरोकेअर एलएलपी कंपनीच्या प्रक्रिया केल्या जाणाऱ्या कचऱ्यातून सेंद्रिय खत निर्मिती व आरडीएफ तयार केले जाणार आहे.