मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अन्नधान्यासह दैनंदिन गरजेच्या वस्तू जम्मू- काश्मीरला रवाना
मुंबई १० : जम्मू – काश्मीर मधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे दैनंदिन गरजेच्या वस्तू, अन्न- धान्य व अन्य साहित्य मंगळवारी पाठवण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. प्रदेश भाजपा कार्यालय येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी झेंडा दाखवून प्रातिनिधिक स्वरुपात सामग्री घेऊन जाणा-या पहिल्या ट्रकला रवाना केले. असे अनेक ट्रक ठिकठिकाणांहून पाठवण्यात येणार आहेत. यावेळी कार्यालय सह प्रभारी सुमंत घैसास, ज्येष्ठ नेते सुनील कर्जतकर, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान, असिफ भामला, कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी, कार्यालय सह-सचिव भरत राऊत आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या जनतेच्या पुनर्वसनासाठी प्रदेश भाजपा कटिबद्ध आहे. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी जम्मू- काश्मीर भाजपा अध्यक्ष आणि पदाधिका-यांशी बोलून काय गरजेचे आहे ते जाणून घेतले आणि त्यानुसार दैनंदिन गरजेचे साहित्य पाठवत आहोत. साहित्य वाहून नेणारे अनेक ट्रक राज्यातील ठिकठिकाणाहून जम्मू-काश्मीरमध्ये जाणार आहेत. जेवढे लागेल तेवढे सहाय्य करण्याचा प्रदेश भाजपाकडून प्रयत्न केला जाईल असेही फडणवीस यांनी नमूद केले. देशाच्या कानाकोप-यातील जनतेवर कोणतेही संकट ओढवले तर विविध राज्यातून एकमेकाला मदत करणारे लोक आहेत हे कौतुकास्पद आहे. प्रदेश भाजपाने तातडीने मदत पाठविण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे अभिनंदन केले.
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, भाजपा जम्मू – काश्मीर चे प्रदेशाध्यक्ष सतपाल शर्मा, विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांच्याशी बोलून पूरग्रस्तांना कोणत्या वस्तूंची, साहित्याची गरज आहे हे जाणून घेतले. त्यानुसार मदत साहित्य पाठविण्यात आले आहे.
प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे जम्मू- काश्मीर मधील पूरग्रस्तांना पाच हजार तंबू, दहा हजार गाद्या, दहा हजार ब्लँकेट, स्वयंपाकाच्या शेगड्या, पाच हजार छोटे गॅस स्टोव, पाच हजार सौर ऊर्जेवर चालणारे दिवे, दहा किलो तांदळाच्या पाच हजार पिशव्या, दहा किलो गहू पीठाच्या ( आटा) पिशव्या आणि दहा किलो साखरेच्या पाच हजार पिशव्या, एक लीटर खाद्य तेलाच्या पाच हजार बाटल्या, महिला व पुरूषांचे कपडे, स्वेटर प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे मदत साहित्य पाठवण्यात आले अशी माहिती चव्हाण यांनी दिली.




