संजय कारवटकर, प्रतिनिधी
नागपूर :- वडकी परिसरात गेल्या काही दिवसांपासून महावितरणच्या हलगर्जीपणामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. पावसाळ्याच्या दिवसांत वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. थोडासा वारा, हलका पाऊस किंवा विजा कडाडल्या की रात्रभर लाईट बंद — अशी सध्याची परिस्थिती आहे.
पावसाळ्यापूर्वी योग्य नियोजन न केल्यामुळे वडकी परिसरातील येवती, चहाद, खडकी, परसोडा आदी गावांमध्ये विजपुरवठा अनियमित होत आहे. कधी दोन तासांनी लाईट येते तर कधी रात्रभर परतच येत नाही. याचे नेमके कारण मात्र नागरिकांना समजत नाही. त्यामुळे “कर्मचाऱ्यांचा आळशीपणा आणि अभियंत्यांचे नियंत्रण नसणे” हेच कारण असावे, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. रात्रभर बंद असलेली लाईन सकाळी पाच वाजता मात्र सुरू होते, याकडेही लोकांचे लक्ष वेधले जात आहे.
लाईटबिल मात्र अवाढव्य येते, पण विजपुरवठा खंडित झाला की महावितरणकडून तत्परता दिसत नाही. उलट, बिल न भरल्यास लगेच कनेक्शन कापले जाते. या हलगर्जीपणाच्या निषेधार्थ येवती येथील काही युवकांनी अर्धनग्न अवस्थेत वडकी महावितरण कार्यालय गाठले होते.
“वादळ-वारा क्षणभर, पण लाईट जाते वारंवार” — अशी चर्चा आता सर्वत्र ऐकू येते. त्यामुळे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून वडकी परिसरातील जनतेला या त्रासातून मुक्त करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.




