spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बिबट्याचे ए.आय. जनरेटेड फोटो बनवून अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई; वनपरिक्षेत्र अधिकारी सी. जे. रहांगडाले यांचा इशारा

हंसराज, प्रतिनिधी भंडारा सिहोरा :- सोशल मीडियावर बिबट्याचा वावर असल्याच्या खोट्या अफवा पसरवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्यांविरुद्ध आता वनविभाग आक्रमक झाला आहे. अशा खोडसाळ प्रवृत्तींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा तुमसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सी. जे. रहांगडाले यांनी दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सिहोरा परिसरातील चुल्हाड आणि सिंदपुरी भागात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली होती. सोशल मीडियावर ‘बिबट्या भाऊची एन्ट्री चुल्हाडमध्ये’ अशा मथळ्याखाली काही फोटो वेगाने व्हायरल झाले होते. सिंदपुरी-चुल्हाड रस्त्यावर एक बिबट्या चालताना या फोटोंमध्ये दिसत होता. या फोटोंमुळे परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते, परिणामी नागरिकांनी घराबाहेर पडणेही टाळले होते.

तपासात धक्कादायक खुलासा: फोटो चक्क ‘ए.आय.’ बनावट

या प्रकरणाची गंभीर दखल घेत तुमसर वनपरिक्षेत्राच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मात्र, संपूर्ण परिसरात बिबट्याच्या पाऊलखुणा (Pugmarks) किंवा शिकारीचे कोणतेही पुरावे आढळून आले नाहीत. अधिक तांत्रिक तपासणी केली असता, हे फोटो खरे नसून कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए.आय. (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून जनतेत भीती पसरवण्याचा हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

दोषींविरुद्ध गुन्हे दाखल होणार

या प्रकाराची वनविभागाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. “ए.आय. जनरेटेड खोटे फोटो बनवून समाजात दहशत निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे,” असे वनपरिक्षेत्र अधिकारी सी. जे. रहांगडाले यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी अशा कोणत्याही अपुष्ट माहितीवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही अफवा पसरवू नयेत, असे आवाहनही वनविभागामार्फत करण्यात आले आहे.

Popular Articles