spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

– यंत्रणांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकारी विकास मीना यांचे निर्देश

यवतमाळ :- येत्या अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कुठेही बालविवाह होऊ नयेत, यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहून नागरिकांनीही सक्रिय सहकार्य करावे. तसेच बालविवाह करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले आहे.

कायद्यानुसार विवाहासाठी मुलाचे किमान वय २१ वर्षे आणि मुलीचे १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. यापेक्षा कमी वयात विवाह करणे हे बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत बेकायदेशीर आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक, तर शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी यांची बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गावपातळीवर सरपंच, पोलीस पाटील आणि अंगणवाडी सेविका यांनी सतर्क राहून विवाहापूर्वी वधू-वरांचे वय तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बालविवाह हा दखलपात्र गुन्हा असून, यात केवळ पालकच नव्हे तर विवाह सोहळ्यात सहभागी होणारे वऱ्हाडी, भटजी, वाजंत्री, मंगल कार्यालय चालक तसेच बिछायत केंद्र चालक यांच्यावरही गुन्हे दाखल होऊ शकतात. दोषींना २ वर्षांपर्यंत सश्रम कारावास आणि १ लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते.

बालविवाहाची माहिती मिळाल्यास नागरिकांनी १०९८ या निशुल्क क्रमांकावर कळवावे, असे आवाहन करुन माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Popular Articles