नागपूर :- श्री उमियाशंकर नारायणजी हायस्कूलमध्ये शैक्षणिक सत्र २०२६-२७ च्या प्रारंभानिमित्त विद्यार्थी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे शाळेत उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी लकडगंज वार्डाचे नगरसेवक संजय अवचट, गांधीबाग झोनच्या नगरसेविका उमा देशमुख, नगरसेवक श्रीकांत आगलावे, नागपूर शहर युवा मोर्चाचे उपाध्यक्ष नितीन इटनकर, नागपूर गुजराती मंडळाचे सदस्य विनोद पटेल व खेता पटेल तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे मिठाई देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी पालक- शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत शैक्षणिक वर्षभर राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सहशालेय उपक्रम, शाळेची कार्यपद्धती तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती पालकांना देण्यात आली.
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल उत्साह निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा प्रवेशोत्सव आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.




