spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडारा जिल्ह्यात रेती तस्करीत ‘सुपर एन्ट्री’चा धुमाकूळ; माजी आमदार चरण वाघमारे यांचा खळबळजनक आरोप

– रॉयल्टीविना रेतीची चोरी अन् दुप्पट वाहतूक; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करूनही कारवाई शून्य

हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- जिल्ह्यातील रेती घाटांवर सध्या पर्यावरणाच्या ना हरकत प्रमाणपत्राअभावी (NOC) काही ठिकाणी स्थगिती आहे, तर काही घाट सुरू झाले आहेत. मात्र, या प्रक्रियेत आता ‘सुपर एन्ट्री’ नावाचा एक नवा आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रॉयल्टी न भरता रेतीची राजरोस चोरी करणे आणि ५ ब्रासच्या जागी १० ब्रास रेतीची अवैध वाहतूक करणे, असा हा प्रकार असून यात शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत असल्याचा खळबळजनक आरोप माजी आमदार चरण वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

पत्रकार परिषदेत माहिती देताना चरण वाघमारे म्हणाले की, “माझ्याकडे आलेल्या गोपनीय माहितीनुसार, जिल्ह्यात ‘सुपर एन्ट्री’ नावाचा छुपा व्यवहार सुरू आहे. यामध्ये रेती माफियांकडून ठराविक रक्कम ‘एन्ट्री’ म्हणून घेतली जाते. एकदा ही एन्ट्री दिली की, संबंधित वाहनावर कोणतीही कारवाई केली जात नाही. रॉयल्टीचा कागद नसतानाही ५ ब्रासच्या मर्यादेपेक्षा दुप्पट म्हणजेच १० ब्रास रेतीची वाहतूक केली जाते. ही गाडी कोणीही पकडणार नाही, अशी खात्री या ‘सुपर एन्ट्री’च्या माध्यमातून दिली जाते.”

वाघमारे यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीवर बोट ठेवत सरकारला धारेवर धरले. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्यावर ९ लाख ३५ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे, तर कंत्राटदारांची सुमारे ९५ हजार कोटी रुपयांची देणी अद्याप दिलेली नाहीत. अशा गंभीर परिस्थितीत, जिथे राज्याची तिजोरी रिकामी होत आहे, तिथे भंडारा जिल्ह्यातून मिळणारा करोडो रुपयांचा महसूल या ‘सुपर एन्ट्री’मुळे खाजगी खिशात जात आहे.

या संपूर्ण प्रकरणाची गोपनीय तक्रार राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. मात्र, इतके दिवस उलटूनही शासनाने किंवा स्थानिक प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतलेली नाही, याबद्दल वाघमारे यांनी आश्चर्य व्यक्त केले.

एककीडे राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना दुसरीकडे नैसर्गिक साधनसंपत्तीची ही लूट थांबवणे गरजेचे आहे. ही ‘सुपर एन्ट्री’ तात्काळ बंद झाली पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी,” अशी मागणी चरण वाघमारे यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केली आहे. आता या प्रकरणावर सरकार काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Popular Articles