कामठी :- नगर परिषद कामठी अंतर्गत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर निवडणुकीसंदर्भातील कामकाज सुरू असताना, वारंवार सूचना देऊनही कार्यालयात अनुपस्थित राहिल्याबद्दल सफाई कर्मचारी शुभम कमल बढेल यांना निलंबित करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार दिनांक 04 नोव्हेंबर 2025 ला नगर परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर, नगर परिषद कामठीतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना निवडणुकीच्या कामासाठी तत्पर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
सदर आदेशानुसार, कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी मुख्यालय सोडून परवानगीशिवाय रजेवर जाऊ नये, तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता कार्यालयात उपस्थित राहण्याचे स्पष्ट निर्देश वॉट्सअॅप ग्रुपद्वारे देण्यात आले होते. मात्र, संबंधित कर्मचारी शुभम कमल बढेल यांनी या आदेशाकडे दुर्लक्ष करून अनुपस्थिती दर्शविली.
या गंभीर निष्काळजीपणाबद्दल महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम, 1965 मधील कलम 79 तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 मधील कलम 32 नुसार कारवाई करत सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगर परिषद मुख्याधिकारी, कामठी यांनी संबंधित कर्मचाऱ्याला तत्काळ प्रभावाने निलंबित करण्याचा आदेश दिला आहे.
निवडणुकीच्या अत्यंत महत्त्वाच्या काळात गैरहजेरी दाखवल्याने प्रशासनात शिस्तभंगाची ही बाब मानली जात असून, इतर कर्मचाऱ्यांसाठीही ही कार्यवाही इशारा ठरणारी असल्याची प्रतिक्रिया प्रशासनिक वर्तुळात व्यक्त होत आहे.




